हुपरीत सामूहिक आत्मदहनाचा इशारा

(crime news) हुपरी येथील राजू भीमराव नेर्लेकर (वय 47) हा 15 जानेवारीपासून बेपत्ता असल्याची वर्दी रविवारी त्याची पत्नी पद्मा नेर्लेकर यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे . दीड महिन्यापासून त्याने दामदुप्पट करतो म्हणून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी अनेक गुंतवणूकदार त्याच्या दारात ठिय्या मारून बसले आहेत; मात्र राजू नेर्लेकर इकडे फिरकला नव्हता.

दरम्यान, रविवारी शिवसेना उपनेत्या दीपाली सय्यद यांनी हुपरी पोलीस ठाण्यात येऊन यासंदर्भात माहिती घेऊन कारवाईची मागणी केली होती. यावेळी नेर्लेकर याच्या पत्नी व मुलाला पोलीस ठाण्यात बोलवून माहिती घेण्यात आली. त्याच्या पत्नीने ते घरी आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे घरी आले नाहीत तर तुम्ही गप्प का? बेपत्ता असल्याची तक्रार का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर नेर्लेकर यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सौ. नेर्लेकर यांच्या वर्दीनुसार हुपरीतील राहत्या घरातून राजू हे कामानिमित्त जातो म्हणून गेले असून, अद्याप घरी आले नसल्याचे म्हटले आहे.

सामूहिक आत्मदहनाचा इशारा

दरम्यान, फसवणूक झाल्यामुळे कर्ज काढून गुंतवणूक केलेल्या काही जणांनी आत्महत्या केली आहे, तर काही जण मृत आहेत. काही दिवसांपूर्वी एकाने आत्महत्या केली असून. त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. तरीही प्रशासन याकडे लक्ष देणार नसेल तर या प्रकरणात फसवणूक झालेले साडेचार हजार गुंतवणूकदार व त्यांचे कुटुंबीय मिळून मुंबईत मंत्रालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा देण्यात आला आहे. (crime news)

दीपाली सय्यद यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

गेली कित्येक वर्षे सुरू असणारी ही फसवणुकीची मालिका व ते वसूल करण्यासाठी होत असलेले आंदोलन आता कुठे निर्णायक टप्प्प्यावर येत आहे. रविवारी दीपाली सय्यद यांनी कठोर भूमिका घेत ईडी चौकशीची मागणी करीत थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातल्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले असून, हालचाली गतिमान झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *