कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर जीवघेणी कसरत
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग (highway) चौपदरीकरणाच्या कामास गती आली आहे; मात्र आंबा ते नावली या मार्गात विविध ठिकाणी प्रबोधन फलकांसह वाहनधारकांसाठी सुरक्षाविषयक उपाययोजनांची वानवा असल्याने वाहनधारकांची जीवघेणी कसरत सुरू आहे. विविध ठिकाणच्या धोकादायक वळणांवर वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक गावांतून रस्ता बायपास केल्याने गावातील वाहतुकीवर फारसा परिणाम दिसून येत नाही. या मार्गावरील अनेक ठिकाणची धोकादायक वळणे काढून रस्ता सरळ रेषेत करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांची चांगली सोय होणार आहे.
दाणेवाडी (म्हसोबा मंदिर) ते केर्ली कोल्हापूर बाजूकडील वाघबीळ घाट प्रारंभ स्थळ या मार्गावर मोठा पूल बांधण्यात येत आहे. या पुलामुळे वाघबीळ येथील धोकादायक वळण बायपास होत आहे. मजबूत सिमेंट कॉलमद्वारे भव्य पूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाखालून दाणेवाडीसह कोडोलीकडे वाहने जाण्यासाठी मार्ग आहे, तर दाणेवाडी फाटा येथून पुलावरून थेट वाघबीळ वळणाच्या पुढे महामार्गास रस्ता जोडला आहे. आंबा ते नावली आणि नावली ते चोकाक असे दोन टप्प्यांत स्वतंत्र ठेकेदारांमार्फत काम सुरू आहे. नावली ते शिये या मार्गावरील रस्त्याचे काम मुख्य रस्त्यावर सुरू नाही. त्यामुळे नियमित वाहतुकीस अडथळ येत नाही; मात्र नावली ते केर्ली आणि वाघबीळ घाटात काही ठिकाणी सुरक्षाविषयक काळजी घेतली असली तरी अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीत वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.
वाघबीळ घाटात रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कापण्यात येत आहे; मात्र डोंगराशेजारी वाहनधारकांच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेतली नसल्याने धोका निर्माण झाला आहे. आंबवडे परिसरात मोर्यांची कामे सुरू असून या ठिकाणी काँक्रिटीकरण सुरू असूनही दिशादर्शक फलकांचा अभाव दिसून येते. याच परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण सुरू असून, मुख्य रस्त्यावर काम सुरू असल्याने वाहनधारकांना तारेवरील कसरत करावी लागत आहे. पैजारवाडी, बजागवाडी या भागातही कामे जोरात असली तरी वाहतुकीची कोंडी वारंवार होताना दिसते. बांबवडे मुख्य गावातून रस्त्याचे काम सुरू नसले तरी गावाबाहेरील भागात कामे सुरू आहेत.
त्यामुळे गावाच्या सुरुवातीस आणि शेवटच्या भागात वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशीच परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात शाहूवाडी, करंजफेण, गोगवे, जुळेवाडी, करंजोशी आदींसह महामार्गावरील विविध गावांमध्ये आहे.
वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे
महामार्ग (highway) चौपदरीकरणात अनेक भागांत धोकादायक वळणे काढण्याचे काम सुरू आहे. वाघबीळ व बोरपाडळे येथे दोन मोठे पूल बांधण्यात येत आहेत, तर वाघबीळ घाट, जुळेवाडी खिंडीसह अनेक वळणे काढण्यात येत आहेत; मात्र तेथे वाहनधारकांसाठी सुरक्षा कठडा अथवा खबरदारी घेतलेली नाही.
वृक्षतोडीमुळे वाहतूक विस्कळीत
चौपदरीकरणाच्या कामात सुमारे साडेसहा हजार झाडे तोडण्यात येत आहेत. सध्या शाहूवाडीपासून पुढील भागात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडण्याचे काम सुरू आहे. तोडीनंतर लगेच तोडलेले वृक्ष नेण्यात येत असली तरी काही ठिकाणी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
विद्युत वाहिन्या, खांब स्थलांतरित
चौपदरीकरणाच्या कामात अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्यांचा अडसर आहे. बहुतांश ठिकाणी विद्युत यंत्रणेचे स्थलांतर झाले आहे, तर काही ठिकाणी अद्याप विद्युत खांब रस्त्यातच असल्याने वाहनधारकांची गोची होत आहे.