शेट्टींच्या ‘एकला चलो रे’ ने ‘हातकणंगले’त तिहेरी लढतीचा फटका कोणाला बसणार

(political news) हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर ठेवण्याची भूमिका घेतल्याने येथे तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे आहे; मात्र शेट्टी हे शिवसेनेतील कोणत्याच नेत्याला भेटलेले नाहीत. त्यामुळे येथून तिरंगी लढत अटळ आहे. गेल्यावेळी तिसर्‍या उमेदवाराचा फटका शेट्टी यांनाच बसला होता. आता शिवसेनेचा उमेदवार असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा आहे.

हातकणंगले मतदारसंघ म्हणचे पूर्वीचा इचलकरंजी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आणीबाणीविरोधात 1977 च्या जनता लाटेतही बाळासाहेब माने यांनी याच मतदारसंघातून वादळात दिवा लावण्याचे काम केले होते. देशभर जनता दलाचे उमेदवार विजयी होत असताना इचलकरंजीतून माने विजयी झाले. कल्लाप्पाण्णा आवाडे यांनीही हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यात यश मिळविले. नंतर मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदिता माने या विजयी झाल्या. राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा मतदारसंघ हिरावून घेतला. 2019 च्या निवडणुकीत मात्र शिवसेनेने हा मतदारसंघ काढून घेतला. शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी झाले. आजोबा, आई आणि नातू निवडून येण्याचा विक्रम याच मतदारसंघाने दिला.

धैर्यशील माने सध्या शिंदे शिवसेनेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच या मतदारसंघाचा दौरा केला. त्यांनी येथे गाजत असलेला यंत्रमागधारकांच्या वीज दर सवलतीचा प्रश्न निकाली लावला. त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार घेऊ शकतात; मात्र त्यासाठी यंत्रणेमार्फत हा मुद्दा बिंबविला पाहिजे; मात्र सध्या महायुतीत उमेदवारी कोणाला, याचाच निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत अद्याप घोषणाच न झाल्याने प्रचाराचा धुरळा उठवायचे बाजूलाच राहिले; पण ज्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी आहे तेच उमेदवार कोण, याचीच चर्चा करत आहेत.

शेट्टी यांनी महायुती व महाविकास आघाडीपासून समान अंतर ठेवण्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे आहे. मध्यंतरी राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, तेव्हा जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी त्यावर टीका केली होती. त्यांनाच शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्यानंतर शेट्टी यांनाच शिवसेनेचा पाठिंबा असेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती; मात्र शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ तसेच महायुती, महाविकास आघाडीपासून समान अंतर ही भूमिका कायम ठेवली. ‘मातोश्री’चे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले होते; पण कोणाच्या दारात जाणार नाही, ही भूमिका शेट्टी यांनी कायम ठेवल्याने अखेर वाट पाहून महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. (political news)

या मतदारसंघातून त्यांचे वडील बाबासाहेब पाटील हे काँग्रेस व शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील या मतदारसंघातून विजयी झाले. 2009 व 2014 च्या निवडणुकीत त्यांनी ही जागा आपल्याकडे कायम राखली. ते शिवसेनेकडून रिंगणात उतरले. आता शिवसेना त्यांना लोकसभेच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी करत आहे. या मतदारसंघात राजकीय बलाबल समसमान आहे. तीन विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे, तर तीन मतदारसंघ महायुतीकडे आहेत. प्रकाश आवाडे, विनय कोरे व राजेंद्र पाटील-यड्रावकर महायुतीकडे, तर राजुबाबा आवळे, जयंत पाटील व मानसिंगराव नाईक हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *