जिल्ह्यातील निरक्षर देणार साक्षरतेची परीक्षा!

जिल्ह्यातील असाक्षरांना (Illiterate) साक्षर करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमातंर्गत पहिला परीक्षा रविवारी (दि.17) रोजी होणार आहे. या परीक्षेतून नवसाक्षरांची साक्षरता तपासणी केली जाणार आहे.

शिक्षक, विद्यार्थ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबासह शेजारी असणार्‍या अशिक्षितांना (Illiterate) सुशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण दिले. अशिक्षातांसाठी वर्ग घेण्यात आले. परीक्षा घेण्याची शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील 344 परीक्षा केंद्रातून ऑफलाईन पद्धतीने सकाळी 10 ते 5.00 यावेळेत ही परीक्षा होईल. जिल्ह्यातून 2 हजार 751 जण परीक्षेला बसणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी दिली.

परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम…

नवसाक्षरांना पायाभूत शिक्षणात बाराखडी, अंकलेखन, वाचन, निरीक्षण ओळख आदींचा यात समावेश आहे. 150 गुणांची परीक्षा होणार आहे. यात 50 गुण लेखन, 50 गुण वाचन व गणितासाठी 50 गुण असणार आहेत. 150 पैकी 51 गुण मिळवणार्‍यांना साक्षर मानले जाणार आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळतील त्यांची पुन्हा सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतली जाईल.

साक्षरतेचे मिळणार गुणपत्रक

‘साक्षरतेतून समृद्धीकडे’ या संकल्पनेतून केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांची जिल्ह्यात अंमलबजवणी सुरू आहे. ज्यांना साक्षर केले आहे, अशांची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर असाक्षरांना केंद्र सरकारकडून प्रमाणपत्र, गुणपत्रक देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *