अजूनही ‘हे’ भाजपचे षड्यंत्र आपल्याला ओळखता आले नाही

(political news) अजूनही आपली उमेदवारी जाहीर होत नाही, हे भाजपचे षड्यंत्र आपल्याला ओळखता आले नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर पलटवार केला.
शाहू महाराज यांना निवडणुकीला उभे करणे हे देशाचे नेते शरद पवार यांचे षड्यंत्र आहे, असे विधान मंडलिक यांनी केले होते. त्यावर खा. मंडलिक यांचे हे विधान अपरिपक्वपणाचे असल्याचेही पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.

पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, 2009 ची निवडणूक ही सदाशिवराव मंडलिक यांनी एका वेगळ्या वळणावर लढवली, हे सर्वांनाच माहीत आहे. मंडलिकांनी आयुष्यभर जातीयवादी पक्षाच्या विरोधात आवाज उठवला. फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार शेवटपर्यंत जपला. हा विचार जपताना कधीही कुणावर खालच्या पातळीवर टीका केली नाही, हे त्यांचे मोठेपण होते; मात्र खा. संजय मंडलिक यांनी पवारांवर टीका करून स्वतःचे हसू करून घेतले आहे.

आपण पूर्णतः जातीयवादी पक्षाच्या वळचणीला जाऊन बसला आहात. हा दोष तुमचा आहे. अजूनही आपली उमेदवारी जाहीर केली नाही, हे भाजपचे षड्यंत्र आपल्याला ओळखता आले नाही, असे सांगत देश आणि फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार अडचणीत असताना शाहू महाराज यांनी स्वतःहून निवडणुकीला उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोणीतरी सांगितल्याने निवडणूक लढवतील इतके ते अपरिपक्व नाहीत. शरद पवार यांच्या मनात असे काही असते, तर त्यांनी स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या नावे देणार्‍या पुरस्कारावेळी आपण आयोजित केलेल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरील कार्यक्रमाला हजेरी लावली नसती. त्यावेळेस तो विषय संपला होता, हे आपल्या कळाले नाही, याचे आश्चर्य वाटते. (political news)

शाहू महाराज आणि सदाशिवराव मंडलिक यांचे व्यक्तिगत संबंध सर्वश्रुत आहेत. दोघांनीही एकमेकांवर अगदी मनापासून नुसतेच प्रेम केले नाही, तर कौटुंबिक नातेही जपले. त्यांच्या प्रत्येक घरगुती कार्यक्रमात स्वतः जातीने उपस्थित राहणारे शाहू महाराज आम्ही पाहिलेत, अनुभवले आहेत. आजही मंडलिक घराण्याविषयी त्यांच्या मनात नितांत आदर आहे, याचाही अनुभव आपणास वेळोवेळी आलेला आहे. असे असताना असे विधान करणे योग्य नाही, असेही पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *