‘स्वाभिमानी’ मविआत सहभागी होणार? राजू शेट्टींची भूमिका स्पष्ट

(political news) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी (१६ मार्च) पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा स्वाभिमानीकडून केला जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी साद घालण्यात आली आहे. त्यास राजू शेट्टी यांचा नकार आहे. शेट्टी हे स्वतंत्रपणे लढणार आहेत. महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

शेट्टी यांनी शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बाचचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या उद्धव ठाकरेंबरोबरच्या भेटीनंतर तुम्ही महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, या चर्चेत तथ्य आहे का? यावर राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीत आमची केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर चर्चा चालू आहे. शेतकरी प्रश्नांवर आमचा या पक्षावर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. कारण हा पक्ष अजूनही शेतकऱ्यांबद्दल सकारात्मक आहे. त्यामुळे त्यांच्याशी काही विषयांवर सकारात्मक चर्चा झाली आहे.

एकीकडे दिल्लीत बळीराजा आक्रमक, दुसरीकडे युतीच्या चर्चा; शेतकरी आंदोलनाचा परिणाम SAD-BJP युतीवर होणार?
राजू शेट्टी यांना यावेळी विचारण्यात आलं की, तुम्ही महाविकास आघाडीसमोर जागांचा काही प्रस्ताव ठेवला आहे का? यावर राजू शेट्टी यांनी नाही असं उत्तर दिलं. तसेच ते म्हणाले, आम्ही सहा जागांची तयारी केली आहे. आमचा पक्ष राज्यातल्या लोकसभेच्या सहा जागा लढवू शकतो. परंतु, हा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांवर सोपवला आहे. कारण, आम्हाला कोणी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून किंवा इतर मार्गे पैसे देत नाही. आमच्या कार्यकर्त्यांना पदरमोड करून निवडणुका लढवाव्या लागतात. तरीदेखील आम्ही सहा जागांवर लढू शकतो. शेवटी कार्यकर्त्यांनी आपली आर्थिक ताकद बघून निर्णय घ्यावा अशी मुभासुद्दा आम्ही कार्यकर्त्यांना दिली आहे. (political news)

राजू शेट्टी आणि सावकार मादनाईक यांनी शनिवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या चर्चेवेळी खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. यावेळी शेट्टी यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी साद घालण्यात आली. त्यास शेट्टी यांनी नकार देत त्याची कारणमिमांसा स्पष्ट केली. तसेच महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. महाविकास आघाडी अंतर्गत जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. ते झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असं मातोश्रीवरून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *