सत्ताधारी आघाडीच्या सहा जागांची घोषणा; शिरोळवर अजून तोडगा नाहीच!

(political news) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी, पतसंस्था आणि बँका, प्रक्रिया, महिला, दूध संस्था व अनुसूचित जाती-जमाती या सहा गटांतील उमेदवारांची घोषणा सत्ताधारी आघाडीने सोमवारी केली. दरम्यान, दिवसभरात सहा तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर वाटाघाटी फिस्कटल्याने दोन जागांसह स्वीकृतचा प्रस्ताव शिवसेनेने अमान्य करत, स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केली. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत चर्चेतून मार्ग न निघाल्यास सत्ताधारी उर्वरित तीन जागा तसेच शिवसेना संपूर्ण 19 उमेदवारांची घोषणा करणार आहे.

जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 5 जानेवारीला मतदान होत आहे. अर्ज माघारीला शेवटचा दिवस बाकी असताना शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. गगनबावडा आणि कागल तालुका संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे बिनविरोध झाले आहेत. उर्वरित दहा जागांवर ताकदीनुसार जो-तो लढणार असल्याचे यापूर्वीच ठरले आहे. उर्वरित नऊ गटांतील जागावाटपाचा तिढा कायम होता. शिवसेनेला प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक आणि महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने या दोन जागा सत्ताधारी आघाडीने देऊ केल्या आहेत.

शिवसेनेने अजून तिसर्‍या जागेची मागणी केल्यानंतर स्वीकृत संचालक देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आघाडीने दिला. शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास चर्चेच्या फेर्‍या होऊनही वाटाघाटी फिस्कटल्या. रात्री नऊ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत अजून तिसरी जागा द्यावी; अन्यथा पॅनेलची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे यांनी सुमारे दोन तास बंद खोलीत चर्चा केली. शिवसेनेचा निर्णय झाल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सहा जागांची घोषणा केली. शिवसेनेच्या अंतिम निर्णयानंतर उर्वरित तीन जागांची घोषणा मंगळवारी अकरा वाजता केली जाणार असल्याचे जाहीर केले. (political news)

सहा जागांमध्ये जनसुराज्य आणि आवाडे गट यांना ओबीसी आणि पतसंस्था गट, प्रक्रिया आणि दूध संस्था गट राष्ट्रवादीला, तर महिला गटातील एक आणि एससी गट काँग्रेसला, अशी सहा जागांची वाटणी करण्यात आली. प्रक्रिया आणि महिला गटातील प्रत्येकी एक जागा आणि एनटी गटातील एक अशा तीन जागांची घोषणा होणे बाकी आहे.

चर्चेतून तोडगा निघाल्यास प्रक्रिया आणि महिला गटातील दोन जागा शिवसेनेला, तर एनटीची जागा स्वाभिमानी किंवा काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकते. शिवसेनेने स्वीकृत जागेचा प्रस्ताव मान्य केला तरच पेच सुटणार आहे; अन्यथा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आघाडी, जनसुराज्य पक्ष, तर दुसर्‍या बाजूला शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजता सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे होत आहे.

जिल्ह्यात संस्थात्मक गटात काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. महाविकास आघाडी म्हणून राज्यात सर्वाधिक सत्तेत वाटा कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला सन्मानाने दिला आहे. ‘गोकुळ’मध्ये प्रत्येकी दोन-दोन संचालकपद दिले. दोन्ही काँग्रेसचे 27 जिल्हा परिषद सदस्य असूनही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेतले. तर शिवसेनेचे दहा सदस्य असूनही चार पदे दिली. शिवसेनेला अजून एक संधी देण्यासाठी सहा जागांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका फोनवर आजरा कारखान्यासाठी जिल्हा बँकेने 70 कोटी रुपये कर्ज दिले. शिवसेना मित्रपक्ष असल्याने आम्ही वाट पाहू. अजूनही शिवसेनेने विचार करावा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शिरोळवर अजून तोडगा नाहीच!

शिरोळमध्ये मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि गणपतराव पाटील यांच्यात कोणी माघार घ्यायची, हे अद्याप ठरलेले नाही. दोघांत समझोता होईल, अशी नेत्यांना आशा आहे. शिरोळ, शाहूवाडी, आजारा येथे मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. भुदरगड, पन्हाळा, करवीरसह अन्य तालुक्यांत अर्ज असल्याने शिवसेनेने पॅनेल केल्यास लढती होणार आहेत.

शिवसेनेचा तिढा सुटणार कसा?

जागावाटपावरून शिवसेनेने ताठर भूमिका घेतली. स्वीकृतचा प्रस्ताव फेटाळत एका जागेवरून वाटाघाटी फिस्कटल्या. शिवसेनेला सत्ताधारी आघाडीने तिसरी जागा दिली, तरी तिढा कसा सुटणार, हा पेच कायम आहे. आ. प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, संग्राम कुपेकर आदी उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे वाटाघाटींनंतरही शिवसेनेतील अंतर्गत तिढा कायमच राहील, अशी चिन्हे आहेत.

…तर इकडचे तिकडे होणार

जिल्हा बँकेच्या सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलच्या घोषणेबाबत कमालीची उत्सुकता होती. अनेक विद्यमान संचालकांना धाकधूक होती. आ. विनय कोरे यांच्या विरोधानंतर प्रक्रिया गटातून बाबासाहेब पाटील-असुर्लेकर यांचा पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी थेट शिवसेना पदाधिकारी बसलेला कक्ष गाठला. शिवसेना पदाधिकार्‍यांशी पाटील यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनेलची घोषणा झाल्यास बाबासाहेब पाटील सत्ताधारीविरोधात लढतील, अशी शक्यता व्यक्‍त होत आहे. शिवसेनेच्या पॅनेलमधून मंत्री यड्रावकर, खा. संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आदींसह आजी-माजी संचालक रिंगणात उतरतील. माजी खासदार निवेदिता माने यांच्या उमेदवारीबाबत दोन्ही आघाड्यांनी दावा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *