कोल्हापूर : ग्रामसेवकासह सात जणांना सक्तमजुरी
(crime news) कोतोली (ता. पन्हाळा) येथे 2014 साली शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारी प्रकरणी न्यायालयाने 7 जणांना दोषी ठरवले. यामध्ये एका महिलेचाही समावेश असून आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीत ग्रामसेवक सुरेश संजय पाटील, अजित वसंत पाटील, संजय केरबा पाटील, वसंत केरबा पाटील, सागर संजय पाटील, विनायक वसंत पाटील आणि नकुशा ऊर्फ लक्ष्मी वसंत पाटील अशी त्यांची नावे आहेत. आरोपी सुरेश पाटील हे सध्या थावडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामसेवक म्हणून काम पाहात होते.
कोतोली (ता. पन्हाळा) येथील पाटील कुटुंबीयांत शेत जमिनीचा वाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांतही परस्परविरोधी तक्रारी दाखल होत्या. याच वादातून 10 मे 2014 रोजी बाजीराव श्रीपती पाटील यांना मारहाण करण्यात आली. फावडे, गज, काठ्यांनी झालेल्या मारहाणीत बाजीराव यांच्यासह निलेश, युवराज, सुनीता, लक्ष्मी व हौसाबाई पाटील असे सहा जण जखमी झाले होते.
याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात संशयित सुरेश, अजित, संजय, वसंत, सागर, विनायक आणि नकुशा पाटील या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (crime news)
या खटल्याचे काम जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग 2) बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात चालले. सरकार पक्षातर्फे अॅड. मंजुषा पाटील यांनी 17 साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर संबंधित सात जणांना 10 वर्षे सक्तमजुरी सह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी केला. सरकार पक्षाला पैरवी अधिकारी शाम बुचडे व शहाजी पाटील यांचे सहकार्य मिळाले.