महादेव ऑनलाईन बेटिंग प्रकरण नक्की आहे तरी काय?

(crime news) महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप सह 22 ऑनलाईन ॲप केंद्र सरकारने प्रतिबंधित केले. यात महादेव ऑनलाईन बेटिंग ॲप केसची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांना चौकशीसाठी केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने समन्स बजावल्याने हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं आहे.

अभिनेता रणबीर कपूर , श्रद्धा कपूर, कपिल शर्मा यांच्यासह अनेकांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे.याप्रकरणात बॉलिवूड कलाकारांची नावं यायला लागल्यापासून अनेकांना बरेच प्रश्न पडत आहेत, उत्सुकताही वाढली आहे. ‘महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप’ नेमकं आहे तरी काय, भारतात याचं जाळं नेमकं कसं पसरलं, याच्यामागचा सूत्रधार कोण ? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहेत.

कॉल सेंटर्सचे जाळे

परदेशात दुबईमध्ये बसून सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल हे ॲप भारतात कसं चालवत होते, ते समजून घेऊया. खरं तर, छत्तीसगडसह भारतातील विविध राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये या ॲपची सुमारे 30 कॉल सेंटर्स उघडण्यात आली होती.

ही कॉलसेंटर एकाच साखळीचा भाग बनवून अतिशय चलाखीने चालवली जात होती. सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे त्यांचे 2 जवळचे सहकारी अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने भारतात हे ॲप चालवत होते.

बेनामी खात्यांचा वापर

सर्वात पहिले अनिल आणि सुनील दम्मानी यांच्या मदतीने केवायसीद्वारे मोठ्या प्रमाणात बेनामी बँक अकाऊंट्स उघडण्यात आली. मुख्य संचालक सौरभ चंद्राकर, रवि उप्पल आणि पॅनेल ऑपरेटर अथवाकॉल सेंटर ऑपरेटर यांच्या संगनमताने हे बेटिंग सिंडिकेट ॲप चालवण्यात येत होतं. ॲप चालवण्यासाठी छत्तीसगडमधील पोलिस, राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना भागीदारी देण्यात आली होती.या प्रकरणी तपास यंत्रणांना 90 हून अधिक बनावट बँक खात्यांची माहिती मिळवली आहे. या बनावट खात्यांचा वापर सट्टय़ाच्या रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. (crime news)

या बँक खात्यांबाबतची माहिती घेतली असता त्यात 2000 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. त्यातील 68 बँक खात्यांमध्ये 3.86 कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याप्रकरणी यापूर्वी राजस्थान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून 20 हून अधिक डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आली होती. ही बँक खाती सट्टेबाजी अॅप व्यवहारांसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे.

हवालाद्वारे व्यवहार

दुबईमध्ये स्थित ॲपचे संचालक हवालाच्या माध्यमातून छत्तीसगडमधील अनिल आणि सुनील दम्मानी यांना मोठी रक्कम पाठवत होते. त्यानंतर, हे पैसे छत्तीसगड पोलिसांचे अधिकारी चंद्रभूषण वर्मा यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचा आरोप आहे.

छत्तीसगड पोलिसांमध्ये तैनात असलेले पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तीपर्यंत हे पैसे ( लाच म्हणून) पोहोचवण्याची जबाबारी वर्मा याच्यावर होती. हवालाद्वारे हे पैसे रायपूर येथील सदर बाजारातील एका ज्वेलर्सकडे पाठवण्यात येत असल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *