महापूर नियंत्रण प्रकल्पासाठी तातडीने डेटा जमा करा : जिल्हाधिकारी
कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर (flood) नियंत्रण प्रकल्पासाठी (एमआरडीपी) सर्व डेटा जमवा. त्यानुसार उपाययोजनांचा आराखडा तयार करा, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महापालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रण, उपाययोजनांसाठी जागतिक बँकेची समिती दि. 14 पासून दोन दिवसांच्या दौर्यावर येत आहे. त्याच्या तयारीसाठी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण करणे, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवणे याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) हा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने पूर्ण केला जाणार आहे. याकरिता जागतिक बँकेच्या दोन समित्या (टीम ए आणि टीम बी) 14 व 15 फेब—ुवारी रोजी राज्याच्या दौर्यावर येत आहेत. पहिल्या समितीत (ए) तीन सदस्यांचा तर दुसर्या समितीत (बी) सहा सदस्यांचा समावेश आहे. सहा सदस्यीय समिती कोल्हापूर जिल्हा दौर्यावर येणार आहे. तीन सदस्यीय समितीकडून (ए) सातारा, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे.
समितीच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी रविवारी सायंकाळी आढावा बैठक घेतली. समितीकडून बुधवार, दि. 14 पासून जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार बैठकीत समितीकडून पाहणी करण्यात येणारी संभाव्य ठिकाणे निश्चित करण्यात आली. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, समिती ज्या ठिकाणी पाहणी करणारी ठिकाणे निश्चित केली आहेत, त्या ठिकाणची महापुराबाबतची सर्व माहिती तयार ठेवा. आपल्या विभागाकडून यापूर्वी झालेले विविध सर्व्हे, पाहणी, त्यातून उपलब्ध झालेली आकडेवारी, दरवर्षीची आकडेवारी, पूर पातळी, पावसाचे प्रमाण, होणारे नुकसान, परिणाम आदी सर्व डाटा एकत्र करा. त्या आकडेवारीनुसार योग्य आणि अचूक सादरीकरणाची तयारी ठेवा.
दौर्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
समितीचा दौरा झाल्यानंतर महापूर (flood) नियंत्रणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असे सांगत जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, महापूर नियंत्रणासाठी उपाययोजनांचा नेमका आराखडा तयार करा. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार्या उपाययोजनांची माहिती दिली.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, सांगलीच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, महापालिका शहर अभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.