अंबाबाई तीर्थक्षेत्र पुनर्विकासाला गती देणार

करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र पुनर्विकासाचा (redevelopment) हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला गती दिली जाईल, असे जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सोमवारी सांगितले. वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी सवलतीची मुदत 8 मार्च रोजी संपत आहे. त्याला पुन्हा मुदतवाढ देण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देवरा दोन दिवसांच्या कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी देवरा म्हणाले, अंबाबाई तीर्थक्षेत्र पुनर्विकासाचा (redevelopment) तयार झाला आहे. तो अद्याप शासनाकडे प्राप्त झालेला नाही. मात्र येत्या काही दिवसांत तो राज्य शासनाला सादर होईल. त्यानंतर त्याला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणे आणि अंमलबजावणी करणे या सर्व प्रक्रियेला गती दिली जाईल.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पीएम गतिशक्ती योजनेतून होणार आहे. नियोजन विभागाशी समन्वय ठेवून या प्रकल्पालाही पुढे नेण्यासाठी राज्य शासन स्तरावरील आवश्यक ती सर्व प्रक्रिया केली जाईल, असेही देवरा यांनी सांगितले.

वर्ग दोनचे वर्ग एक करण्यासाठी मुदतवाढ नाही

जमीन, सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील भूखंड आदी वर्ग दोनचे वर्ग एक करण्यासाठी 8 मार्च 2024 पर्यंत नजराना शुल्कात सवलत दिली होती. अशी सवलत दुसर्‍यांदा दिली आहे. यापुढे मात्र या सवलती योजनेला मुदतवाढ दिली जाणार नाही, असा कोणताही प्रस्ताव सध्या नसल्याचे देवरा यांनी सांगितले.

क्षेत्र मर्यादा वाढवणार नाही

तुकडेबंदीसाठी क्षेत्र मर्यादा वाढवली आहे. यापुढे आणखी क्षेत्र मर्यादा वाढवली जाणार नाही, असे स्पष्ट करत या कायद्यातील काही तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा दोन महिन्यांत अहवाल येईल. त्यानुसार समितीकडून सादर होणार्‍या शिफारशीवर विचार होईल आणि त्यातील काही तरतुदीत सुधारणा करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही देवरा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *