कोल्हापूर : आता शहरात कारवाई तीव्र होणार

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका (Municipal Corporation) प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बेकायदेशीर केबिन्स, गाड्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी शहरातील मुख्य रस्ता असणार्‍या भाऊसिंगजी रोडवर कारवाई करून 42 गाडे, केबिन्स हटविण्यात आल्या. जेसीबी, ट्रॅक्टरच्या मदतीने करण्यात आलेल्या कारवाईवेळी पोलिस बंदोबस्तही तैनात होता.

महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरात कारवाईचा बडगा उगारला आहे. काही दिवसांपूर्वीच खासबाग खाऊ गल्लीमधील बेकायदा केबिन्सवर कारवाई झाली. या पाठोपाठ आता शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यात येत आहे. मंगळवारी सीपीआर चौक ते महापालिका चौक मार्गावरील बेकायदा केबिन्सवर कारवाई झाली.

दुपारी तीनच्या सुमारास अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सीपीआर चौकात दाखल झाले. सीपीआर कंपौंडलगत असणार्‍या बेकायदा केबिन्स हटविण्यास सुरुवात झाली. अनेकांनी सिमेंट, काँक्रिटचे बांधकाम करून त्यामध्ये केबिन्स बसविल्या होत्या. अशा केबिन्सना परवानगी नसताना असे प्रकार पाहायला मिळाले. (Municipal Corporation)

कारवाईमध्ये महापालिका इस्टेट विभागाचे लिपिक सचिन जाधव, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडितराव पोवार, लिपिक सज्जन नागलोट, रवींद्र कांबळे, शरद कांबळे, राजू माने, शहर वाहतूक शाखेचे शिवाजी सूर्यवंशी, राजेंद्र माने, तानाजी सुंभे, भगवान गिरी, संजय कोळी आदींनी सहभाग घेतला.

सीपीआर चौकातून कारवाईला सुरुवात होताच 21 गाडे मालक व 9 केबिन मालकांनी स्वत:हून केबिन काढून घेतला. तर 12 गाडे अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केले. रात्री उशिरापर्यंत केबिन्स जागेवरून इतरत्र हलविण्याचे काम सुरू होते.

फेरीवाला म्हणून महापालिकेकडे नोंदणी असणार्‍यांनी दिवसभर विक्री संपवून गाडा घेऊन जाणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकांनी दोन ते अडीच फुटांचे बांधकाम करून त्यामध्ये केबिन्स बसविल्या होत्या. अशा केबिन्स काढण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात येत होता.

बघ्यांची गर्दी

भाऊसिंगजी रोड हा वर्दळीचा मार्ग आहे. अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना वाहनधारकांसह बघ्यांची मोठी गर्दी या मार्गावर झाली होती. लक्ष्मीपुरी पोलिसांसह शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनाही याठिकाणी पाचारण करण्यात आले.

शहरात कारवाई तीव्र होणार

भाऊसिंगजी रोडसोबत आता शहरातील सर्वच मुख्य मार्गांवर कारवाई करण्यात येणार आहे. हातगाडे, केबिन्सचे अतिक्रमण, फूटपाथवरील विक्रेत्यांचे अतिक्रमण, पार्किंगच्या ठिकाणी उभे करण्यात आलेले हातगाडे अशा सर्व बेकायदा केबिन्सवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *