कोल्हापुरातील माजी मंत्र्यांच्या नातवाला अटक

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी) (Mansing Bondre) याने राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केला होता. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्याना आज अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
अंबाई टँक कॉलनी परिसरात बेछूट गोळीबार केल्यानंतर पसार झालेला संशयित मानसिंग विजय बोंद्रे ( रा. अंबाई टँक कॉलनी) याला रत्नगिरीतून अटक करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. बुधवारीच त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायायलयाने फेटाळला होता.
मालमत्तेच्या वादातून अभिषेक बोंद्रे आणि त्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्याचा आरोप मानसिंग बोंद्रे याच्यावर आहे. याबाबत अभिषेक बोंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मानसिंग बोंद्रे पसार झाला होता.
पोलिसांनी यापुर्वी त्याचा साथीदाराला अटक केली होती. मात्र, मानसिंग बोंद्रे पसार झाला होता. यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, बुधवारी त्याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयातूनही फेटाळण्यात आल्याने त्याला केव्हाही अटक होणार होती.
मानसिंग चालकासोबत रत्नागिरीत असल्याची माहिती मिळाल्याने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आपले पथक त्याठिकाणी पाठवले होते. शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मध्यरात्री त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असुन आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.