आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्या

एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी (workers) रस्त्यावर उतरले आहेत; पण हे राज्य शासन आमची दखल घेण्यास तयार नाही. तेव्हा तुम्ही आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्या, अशी उद्विग्‍न कैफियत एसटी कर्मचार्‍यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली. यावर आ. पाटील यांनी आपला न्यायालयावर विश्‍वास आहे. न्यायदेवता आपल्याला न्याय देईल, तोपर्यंत कोणीही टोकाची भूमिका घेऊ नये, असा विश्‍वास कर्मचार्‍यांना दिला.

एसटी कर्मचारी गेली 74 दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे त्यांचा चरितार्थ चालणे अडचणीचे झाले आहे. या कर्मचार्‍यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपने घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना आंदोलनस्थळी जाऊन धान्याचे किट वाटप सुरू केले आहे.

गेली 74 दिवस आंदोलन सुरू आहे. पण हे शासन ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे आमच्या घरची चूल पेटणे बंद होत आले आहे. आता आमच्यापुढे मार्ग उरलेला नाही. घरातील लोकांना किती दिवस सांगावयाचे आज संप मिटेल, उद्या संप मिटेल म्हणून. आता आमचा संयम संपत आहे.

तेव्हा आम्हाला आत्महत्या करण्यास परवानगी द्या, अशी मागणी महिला कर्मचार्‍यांनी (workers) केली. राज्यात भाजपचे 106 आमदार आहेत. त्यांनी एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे, अशी पत्रे मुख्यमंत्र्यांना द्यावीत. हे सरकार आमचे रक्‍त सांडलेले पाहणार असेल तर त्यासाठी आमची तयारी आहे, असा गर्भित इशाराही कामगारांनी दिला.

एसटी कर्मचार्‍यांना धान्याचे कीट

येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसर आणि संभाजीनगर आगाराच्या आवारात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचार्‍यांना आ. चंद्रकांत पाटील यांनी धान्याच्या किटचे वाटप केले.जोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे, तोपर्यंत या कामगारांना धान्याचे किट दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *