गायीच्या दुधाचे दर कमी झाल्याने उत्पादकांची कोंडी

गोकुळ सहकारी दूध संघाने व खासगी संघांनी शेतकर्‍यांच्या दूध (milk) खरेदी दरात तब्बल 2 रुपयांनी कपात केली आहे. परिणामी, दूध उत्पादक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दुधाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. तथापि, दुधास योग्य भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.

पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसायाकडे पाहत होता. मात्र, मध्यंतरी वाढलेल्या दरामुळे तरुणवर्गही दूध व्यवसायाकडे वळला आहे. मागील 16-17 महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकर्‍यांना त्याचा फायदा झाला होता. शिवाय स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने त्याचाही फायदा झाला होता; मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर दूध दरात 2 रुपयांनी घसरण झाली आहे. पशुखाद्याचे दर वाढत असताना, दुधाला (milk) चांगली मागणी असतानाही दर कमी होत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दुधाला प्रतिलिटर 37 रुपये दर मिळाला होता. यामुळे तरुणाई दूध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका दूध दर कपातीमुळे बसणार आहे. नव्याने धंद्यात उतरलेला तरुणवर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणी असूनही गायीच्या दूध दरात 2 रुपयांनी कपात केल्याने संकट वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *