जिल्ह्यात आजही बिनभोबाट तस्करीचा फंडा; महामार्गावर अक्षरश: थैमान

कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यातील कुख्यात तस्करांनी सीमावर्ती भाग आणि पुणे-बंगळूर महामार्गावर अक्षरश: कब्जा केला आहे. गोवा बनावटीच्या विदेशी दारूसह ड्रग्ज तस्करीची (smuggling) दुकानदारीच थाटली आहे. चिरीमिरीला सोकावलेल्या घटकांना तसेच स्थानिक गुंड टोळ्यांच्या आश्रयाने तस्करांनी यंत्रणेसमोर आव्हान निर्माण केले आहे. दीड वर्षात 2 हजार 694 तस्करांना बेड्या ठोकून साडेआठ कोटींचा विदेशी दारूसाठा हस्तगत करूनही जिल्ह्यात आजही बिनभोबाट तस्करीचा फंडा चालू आहे. दारू, गुटख्यासह अमली पदार्थ तस्करांनी महामार्गावर अक्षरश: थैमान घातले आहे.

सीमा भागासह प्रमुख महामार्गावर रात्र-दिवस होणार्‍या तस्करीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी वर्षापूर्वी महाराष्ट्र, कर्नाटकचे राज्यपाल व उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीनंतरही तस्करीच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाल्याचे दिसून येते.

आदेश वार्‍यांवर

गतवर्षी 2022 मध्ये गुन्ह्याचे प्रमाण 1 हजार 935 होते. तत्पूर्वी 2021 मध्ये 1 हजार 689 गुन्ह्यांच्या संख्येत त्यात 246 गुन्ह्यांची भर पडली आहे. याचाच अर्थ उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या िनिर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याऐवजी त्यास कोलदांडा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे.

बेरोजगार तरुणांचा दारू, गुटखा तस्करीकडे कल

पुणे-बंगळूर महामार्गावर गुटखा, अंमली पदार्थांच्या तस्करीसह (smuggling) गोवा बनावटीच्या दारूची रात्र-दिवस रेलचेल आहे. तस्करीतून दररोज कोट्यवधीच्या उलाढाली करणार्‍या महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील नामचिन टोळ्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, सांगली, मिरजेसह दुष्काळी भागातील स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांना हाताशी धरून तस्करीची पाळेमुळे खोलवर रूजविली आहेत. विनासायास मिळणार्‍या कमाईमुळे 18 ते 30 वयोगटातील तरुणी, तरुणही तस्करीच्या उलाढालीत सक्रिय होऊ लागली आहेत. मिसरूडही न फुटलेली पोरं व्यसनाची शिकार ठरू लागली आहेत.

दीड वर्षात 8.64 कोटींचा दारूसाठा हस्तगत

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह बिहारातील कुख्यात दारू तस्कर व संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी संयुक्त पथकांची रात्र-दिवस करडी नजर असतानाही कमाईला सोकावलेल्या नामचिन टोळ्यांनी यंत्रणांना आव्हान दिले आहे. सुरक्षा यंत्रणा भेदून तस्करीचा फंडा चालूच ठेवला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी ते 30 जून 2023 या दीड वर्षाच्या काळात कोल्हापूर येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने 2 हजार 694 तस्करांना बेड्या ठोकत 8 कोटी 63 लाख 11 हजार 691 किमतीचा दारूसाठा हस्तगत केला आहे. दारू तस्कराविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 980 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात कुख्यात आंतरराज्य तस्करांचाही समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *