विशाळगड मार्गावरील गजापूर-केंबुर्णेवाडी दरम्यानच्या तीव्र वळणावर अपघात

किल्ले विशाळगड मार्गावरील गजापूर ते केंबुर्णेवाडी दरम्यानच्या रस्त्यावरील दिवाणबाग नजीकचे तीव्र वळण अलीकडे धोकादायक ठरू लागले आहे. आठवडाभरात दोन अपघात (accident) होऊन पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले. अलीकडे या वळणावरील अपघातात वाढ होऊ लागल्याने वळणाची तीव्रता कमी करण्याची मागणी ग्रामस्थासह प्रवासी वर्गातून होऊ लागली आहे.

दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील पर्यटक गडाला भेट देऊन माघारी जात असताना क्रूझर (KA 24 M 3062) वाहनाचा या तीव्र वळणावर अपघात झाला. वाहनात सुमारे १३ ते १४ पर्यटक होते. सुदैवाने सर्वचजण बचावले. चालकाचे वाहनाच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातांपूर्वी स्वीफ्ट गाडीचा अपघात काही दिवसांपूर्वी घडला होता. या वळणावर किमान १५ दिवसाला अपघात होऊ लागले आहेत.

किल्ले विशाळगड सर्वधर्मीयांच्या एकात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे गडावर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून पर्यटक, भाविक गडाला भेट देत असतात. गजापूर-केंबुर्णेवाडी दरम्यानचा सुमारे पाच किमी लांबीचा हा रस्ता अनेक वळणाचा आहे. रस्त्यालगतच (कासारी) धरणाच्या अथांग जलाशय आहे. पर्यटक जलाशय तसेच निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत गडाकडे जातात, तर काहीजन गड पाहून माघारी जातात. बहुतांश वाहने भरधाव वेगाने ये-जा करतात. तीव्र वळणांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने त्यांचे वाहनांच्या वेगावरील नियंत्रण सुटून वाहन पलटी होणे, दरडीला ठोकारने असे प्रकार घडतात. वाहनांची नेहमीच रेलचेल असल्याने त्या वाहनचालकांना या तीव्र वळणावरून वळण घेताना मोठी कसरत करावी लागते. अन्यथा अपघाताला (accident) सामोरे जावे लागते. त्यातच वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केल्यास वाहन उलटून अपघात होतो.

दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांना या वळणाची सवय झालेली आहे, परंतू नविन वाहनांना मात्र हे वळण चकवा देत असून, या वळणावर आतापर्यंत दहा ते पंधरा वाहनांचा अपघात झाला आहे. मनुष्यहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे या वळणावर गतिरोधक व दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी होत आहे. त्यामुळे काही अंशी अपघाताला आळा बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *