जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पंचगंगेची पातळी खाली

जिल्ह्यात सलग तीन दिवस असलेला पावसाचा (rain) जोर रविवारी ओसरला. शहर आणि परिसरासह जिल्ह्यात बहुतांशी भागात दिवसभर उघडीप होती. धरण क्षेत्रातही पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पाऊस कमी झाल्याने पंचगंगेची पातळी कमी होऊ लागली आहे. सायंकाळी चार वाजता 21.3 फुटांवर असणारी पंचगंगेची पातळी रात्री 8 वाजता 21 फुटांपर्यंत खाली आली.
सलग तीन दिवस दमदार बरसणार्या पावसाने आज अनेक भागात विश्रांती घेतली. अधूनमधून पडणारी सर वगळता शहरात दिवसभर पाऊस झाला नाही. वारंवार सूर्यदर्शनही होत राहिले. रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातही आज पावसाचा जोर कमी झाला. अनेक भागात दिवसभर पाऊस झाला नाही. धरण क्षेत्रातही मध्यम पाऊस झाला.
पंचगंगेसह नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरू होती. आज दिवसभर पंचगंगेची पातळी 21.3 फुटांपर्यंत गेली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली. भोगावती नदीवरील हळदी बंधाराही पाण्याखाली गेला. यापूर्वी कोगे बंधारा पाण्याखाली गेल्याने कोगे-बहिरेश्वर वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. यासह पंचगंगेवरील सात असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.
रविवारी दिवसभर पाऊस (rain) कमी झाला असला तरी शनिवारी सकाळी सात ते रविवारी सकाळी सात या 24 तासांत सहा धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. कोदे परिसरात 140, पाटगाव परिसरात 109, घटप्रभेत 102 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 92, दूधगंगा 65 तर कुंभी धरण क्षेत्रात 65 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात रविवारी सकाळी दहापर्यंत गेल्या 24 तासात सरासरी 15 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 57.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 31.8, भुदरगड 22.2, शाहूवाडी 21.4, आजरा 18.9, चंदगडमध्ये 16.6 तर पन्हाळा आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी 15.1 मि.मी. पाऊस झाला.