अभिनयातून ब्रेक घेण्याच्या निर्णयानंतर समंथाच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची चिंता
(entertenment news) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे. समंथाने तिच्या करिअरबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अभिनयातून काही काळ ब्रेक घेऊन ती तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कळतंय. जवळपास गेल्या वर्षभरापासून समंथा मायोसिटीस या आजाराशी झुंज देत आहे. सोशल मीडियाद्वारे वेळोवेळी तिने याबद्दल आणि तिच्या आरोग्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली. त्यानंतर आता ब्रेकच्या चर्चांदरम्यान समंथाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधील एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये तिने मागच्या सहा महिन्यांना सर्वांत कठीण काळ म्हटलं आहे.
समंथाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सेल्फी पोस्ट केला आहे. या सेल्फीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘हे सर्वांत लांब आणि सर्वांत कठीण सहा महिने होते. अखेर त्याचा अंत केला आहे.’ समंथाची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही. याचसोबत मायोसिटीस आजारामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
समंथाची पोस्ट-
मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. उपचारानंतर जेव्हा जेव्हा ती माध्यमांसमोर किंवा कॅमेरासमोर आली, तेव्हा हा परिणाम तिच्या चेहऱ्यावर अनेकदा पहायला मिळाला. याच आजारामुळे आता तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास वर्षभर ती कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नसून फक्त तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यासाठी तिने आगामी चित्रपटांसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केल्याचं समजतंय. (entertenment news)
या वर्षभरातील काळात समंथा कोणताच तेलुगू किंवा बॉलिवूड चित्रपट स्वीकारणार नाही. त्याऐवजी आपलं संपूर्ण लक्ष ती आरोग्यावर देणार आहे. मायोसिटीस या आजारावर ती पुढील उपचार घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे निर्मात्यांकडून घेतलेली ॲडव्हान्स रक्कम तिने परत केली आहे. सध्या ती अभिनेता विजय देवरकोंडासोबत ‘खुशी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचं हे शेवटचं शेड्युल असून येत्या दोन ते तीन दिवसांत तेसुद्धा पूर्ण होईल. त्याचप्रमाणे तिने ‘सिटाडेल’ या सीरिजचंही शूटिंग पूर्ण केलं आहे.