कोल्हापूर जिल्ह्यात ‘हे’ प्रमाण चिंताजनकच

जिल्ह्यात बालविवाहाचे (child marriage) प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 21 टक्के आहे तर 15 ते 19 या वयातच आई होण्याचे प्रमाण 8.8 टक्के आहे. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात बालविवाहाचे 20 गुन्हे दाखल झाले आहेत.

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. ज्या गावात बालविवाह होईल, त्या गावातील ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तरीही जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार सुरूच आहेत. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात बालविवाहाचे 70 प्रकार उघडकीस आले. ते थांबविण्यात यश आले असले. तरी जे उजेडात आले नाहीत, ते बिनबोभाटपणे पार पडले अशा बालविवाहांची संख्या यापेक्षा कितीतरी पट अधिक आहे.

कौंटुंबिक परिस्थिती आणि प्रेम प्रकरणातून मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याचे समोर आले आहे. उघडकीस आलेल्या प्रेमप्रकरणातून बदनामी होईल, या भीतीने 18 वर्षे पूर्ण

होण्याअगोदरच मुलीचा विवाह लावून मोकळे होण्याचा पालकांचा दृष्टीकोन मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीनेही घातक ठरत आहे. बालविवाहामुळे कमी वयातच मातृत्व लादले जाते, त्याचा परिणाम मुलींच्या आरोग्यासह त्यांच्या वैयक्तिक जीवनमानावरही होत असतो. मात्र, यादृष्टीने सर्व स्तरावर प्रबोधन, जनजागृती होत नसल्याने बालविवाहाचे प्रमाण अजूनही चिंताजनक आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून दर तीन वर्षांनी केल्या जाणार्‍या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-5 (एनएफएचएस-5) (2019-21) मध्ये जिल्ह्यातील 18 वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या (बालविवाह) मुलींचे प्रमाण 21 टक्के नोंदवण्यात आले आहे. यापूर्वीच्या एनएफएचएस-4 मध्ये हेच प्रमाण 30.7 टक्के होते. यामध्ये घट झाली असली तरीही अजूनही बालविवाह (child marriage) होतच आहेत, हे वास्तवही नाकारता येत नाही.

कठोर कारवाईची गरज

बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक जबाबदारीचे भान हवे. त्यासाठी संबंधित सर्वांनाच त्याची जाणीव करून देणे अपेक्षित आहे. प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांनी आपपल्या पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकरिता प्रसंगी कठोर कारवाईचीही गरज आहे. मात्र ती होताना दिसत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *