पंचगंगेच्या पातळीत घट; जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली
जिल्ह्यात सोमवारीही पावसाने (rain) उघडीप दिली. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेच्या पातळीत घट सुरूच आहे. पाणी पातळी कमी होत असली तरी पंचगंगेवरील सात बंधार्यांसह जिल्ह्यातील नऊ बंधारे अद्याप पाण्याखालीच आहेत. दरम्यान रविवारी रात्री उशिरा गगनबावडा तालुक्यातील कोदे हा लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. दरम्यान जिल्ह्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कमीच राहील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शहरात सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर कडकडीत ऊनही पडले होते. काही काळ ऊन-पावसाचा खेळही रंगला. जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतच्या गेल्या 24 तासांत सरासरी अवघा 5.8 मि.मी. इतका पाऊस झाला. गगनबावड्यात सर्वाधिक 20.9 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरीत 9.5 मि.मी. तर आजरा आणि भुदरगड तालुक्यात अनुक्रमे 11.2 आणि 11.5 मि.मी. पाऊस झाला.
धरणक्षेत्रातही पावसाचा (rain) जोर कमी झाला आहे. गेल्या 24 तासात कुंभी (66) आणि घटप्रभा (65) धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरीत 40, पाटगावात 42, घटप्रभा 65 तर जांबरेत 33 मि.मी. पाऊस झाला. पंचगंगेच्या पातळीत रविवारपासून घट होऊ लागली आहे. सोमवारी सकाळी सात वाजता पाणी पातळी 19.10 फुटांवर होती. सांयकाळी चार वाजता ती 18.11 फुटांपर्यंत कमी झाली.