शिवसेना, राष्ट्रवादीमधील फूट कुणाच्या पथ्यावर? जिल्ह्यातील राजकारणात कोणाला होणार फायदा

(political news) मूळ शिवसेना (Shiv Sena) फुटली… मूळ राष्ट्रवादी (NCP) फुटली, याचा फायदा जिल्ह्यातील राजकारणात कोणाला होणार याची उत्सुकता लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या संकेतामुळे वाढली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सहानुभूतीची लाट मिळणार, दोन्ही खासदारांना पुन्हा संधी मिळणार, की नव्यानेच समीकरणे बांधली जाणार, हे सर्व आता युती आणि उमेदवारांवर ठरणार आहे. त्यामुळे येथेच नेत्यांची कसोटी लागणार आहे.

राज्यातील सरकारला फुटीचे ग्रहण लागले आणि स्वाभिमान, निष्ठा, आचारसंहिता या सर्व शब्दांना केराची टोपली दाखवून प्रत्येकाने आपले निर्णय घेतले. अर्थात हे सर्वजण जनतेसाठी, विकासासाठी म्हणून जाहीरपणे सांगतात. राजकारणात आपली योग्य सोय करून घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी पक्ष बदलले, काहींनी पक्षातच राहून निष्ठा बदलली.

पण, त्यांना न्याय मागण्यासाठी पुढील वर्षी पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात यावे लागणार आहे. तेथे मात्र ही फूट कोणाच्या पथ्यावर पडणार याचा निकाल जनता जनार्दन लावेल. मात्र यासाठी जनतेसमोर कोण आणि कसे येणार यावर निर्णय शक्य आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांची भूमिका काय असणार?, दोन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा कोणत्या चिन्हावर लढावे लागणार?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हातकणंगले लोकसभा लढवणार का?, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार?, महाविकास आघाडी म्हणून त्यांची भूमिका काय राहणार?

तसेच माजी आमदारांची पक्षनिष्ठा राहणार की नेतानिष्ठा राहणार? यावरच मतदार त्यांची भूमिका ठरवतील, असे आजचे चित्र दिसून येते. निवडणुकांसाठी अजूनही आठ-दहा महिन्यांच्या कालावधी आहे. त्यामध्येही बदलणारी परिस्थिती फूट नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार, हे ठरवेल असे दिसून येते. (political news)

देशात जे घडेल, ते कोल्‍हापुरात घडेल असे नाही

देशात पंतप्रधान नरेंद्र मोंदीची लाट असताना कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक निवडून आले. शहरांतर्गत रस्त्यांना टोलच्या आंदोलनामुळे कॉंग्रेस सत्तेत असतानाही कोल्हापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही उमेदवार आमदार झाला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष म्हणून लोकसभेला विजयी झाले. तर दोन विद्यमानांना पराभूत करीत जिल्ह्यात सेनेचे दोन खासदार निवडून आले. त्यामुळे राज्यात आणि देशात जे घडेल, तेच कोल्‍हापूर जिल्ह्यात घडेल असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *