कोल्हापूरच्या अर्थविश्वावर आणखी एकाच्या गरूड घिरट्या!

मागील चार-पाच वर्षांत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील हजारो लोकांना काही बोगस कंपन्यांनी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा चुना लावलेला आहे. आता कोल्हापूरकरांना नव्याने गंडा घालण्यासाठी एका नव्या मामाने सुरुवात केली आहे. आतापर्यंत हजारो लोक या फसवणुकीच्या जाळ्यात अडकले असून, संबंधितांनी 50 कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्यात गुंतविल्याचे (invistment) समोर आले आहे.

एक-दोन वर्षांत रक्कम दामदुप्पट करून देतो, शेअर गुंतवणुकीच्या माध्यमातून चौपट परतावा मिळवून देतो. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून दसपट रकम मिळवून देतो, असे सांगून या कंपन्या ठेवीदारांकडून गुंतवणूक करून घेतात आणि एके दिवशी पोबारा करतात. अशाच पद्धतीने गेल्या चार-पाच वर्षांत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकांना जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा गंडा घातला गेला आहे. मात्र, अजूनही गुंतवणूकदारांनी धडा घेतलेला दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी येथील बागल चौकात अशाच एका बोगस कंपनीने आपले भामटेगिरीचे दुकान उघडले आहे. शहरापासून जवळपास 15 किलोमीटरवर असलेल्या एका खेडेगावातील एकजण या भामटेगिरीच्या दुकानाचा सीएमडी आहे. ही एक गुंतवणूक साखळी असल्याचे दिसून येते. म्हणजे एकाने प्रथम गुंतवणूक करायची, नंतर त्या गुंतवणूकदाराने इतर गुंतवणूकदार गोळा करून आपली मूळ रक्कम आणि काही प्रमाणात जादा परतावा मिळवायचा, अशा स्वरूपाची ही योजना आहे. परताव्याच्या रूपाने मूळ रकमेइतकी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचे आमिष या माध्यमातून दाखविले जाते. त्यामुळे मूळ गुंतवणूकदार परताव्याच्या अमिषाने आपले सगेसोयरे, नातेवाईक, शेजारी-पाजारी, मित्रमंडळी यांना गळ घालून या योजनेत गुंतवणूक करायला भाग पाडत आहेत. आतापर्यंत जवळपास पंचवीस हजार गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक (invistment) केल्याची चर्चा आहे.

साखळी योजना असल्यामुळे एकाच्या मागोमाग दुसरा दुसर्‍याच्या मागोमाग तिसरा, चौथा, पाचवा असे गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. हे गुंतवणुकीचे जाळे विस्तारतच निघाले आहे. गेल्या दोन महिन्यात या योजनेत जवळपास 50 कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा झाल्याची खात्रीशीर माहिती आहे. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक आणणा-यांना वेगवेगळी अभिषे दाखवून आणि रोख रकमा देवून अधिकाधिक गुंतवणूकदारांना फशी पाडले जात आहे. या योजनेच्या विस्ताराचा वेग बघता आगामी महिनाभरात गुंतवणूकीचा आकडा किमान तीनशे कोटी रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज आहे.

या मोजनेमध्ये होत असलेली गुंतवणूक अन्य कुठेही न ठेवता फक्त एका व्यक्तीच्या नावावर जमा होत आहे. गुंतवणूकदारांच्या समाधानासाठी आणि त्यांना दाखविण्यासाठी काही कागदोपत्री खेळ करण्यात आलेला आहे. शिवाय गुंतवणूकदार स्वतःच या खात्यांवर गुंतवणूक करीत असल्याने भविष्यात गुंतवणूकदारांसाठी कायदेशीर अडचण येणार आहे, हे निश्चित. या कंपनीने गाशा गुंडाळायची तयारीही चालू केलेली दिसत आहे. त्यामुळे या कंपनीने लोकांना गंडा घालून पसार होण्यापूर्वीच कंपनीशी संबंधितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळण्याची गरज आहे.

कंपनीच्या दलालांची सुरू आहे ऐश..!

या कंपनीच्या सूत्रधाराने गुंतवणुकीसाठी सावरण्यासाठी काही दलालच नियुक्त केले आहेत. हे दलाल आपल्या मधाळ बोलण्याने गुंतवणूकदारांना यात फशी पाडताना दिसत आहेत. बदल्यात या दलालांना भरघोस बिदागी मिळताना दिसत आहे. त्यामुळे कालपर्यंत फटीचर म्हणून फिरणारे या कंपनीचे काही एजंट एकदम चारचाकीतून फिरताना दिसत आहेत. पॉश महागडा ड्रेस, रुबाबदार गॉगल, खिशात पाचशेच्या नोटांचे बंडल आणि बड्या हॉटेलमध्ये खानपान असा या एजटांचा आजकालचा रूबाब आहे. या एजंटांच्या असल्या भपक्याला भुलूनच अनेक गुंतवणूकदार त्यांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *