राज्यात पहिल्यांदाच हा’ प्रकल्प कोल्हापुरात होणार

कोल्हापूर शहरासाठी नदीतून उपसा केलेल्या कच्च्या पाण्यावर शुद्धीकरणाची (purification) प्रक्रिया केली जाते. पुईखडी येथे त्यासाठी 60 एमएलडी क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र असून ते विजेवर चालते. परंतु महापालिका याठिकाणी आता एक कोटी 20 लाख रु. खर्चून सौरऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. परिणामी थेट पाईपलाईनचे पाणी सौरऊर्जेवर स्वच्छ होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार असून महापालिकेचे वर्षाला 36 लाख रु. वाचणार आहेत. राज्यात पहिल्यांदाच सौरऊर्जेवर जल शुद्धीकरण केंद्र चालविण्याचा प्रकल्प कोल्हापुरात होणार आहे.

शहराला पाणी पुरवठ्यासाठी 1999 ते 2000 सालात शिंगणापूर पाणीपुरवठा योजना अमलात आली. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा येथून उपसा केलेल्या कच्च्या पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यासाठी पुईखडी येथे 2000 मध्ये जल शुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले. 60 एमएलडी क्षमतेचे हे जल शुद्धीकरण 31 मे 2000 ला सुरू करण्यात आले. या केंद्रात शुद्ध केलेले पाणी शहराला पुरविण्यात येते. पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेसाठी महिन्याला सुमारे 3 लाख रु. वीज बिल येते.

काळम्मावाडी धरणातून 488 कोटींच्या थेट पाईपलाईन योजनेचे पाणी लवकरच कोल्हापुरात येणार आहे. थेट पाईपलाईनच्या पाण्यासाठी पुईखडी येथे 80 एमएलडी क्षमतेचे नवीन जल शुद्धीकरण (purification) केंद्र बांधले आहे. त्याला 60 एमएलडीच्या जुन्या जल शुद्धीकरण केंद्राला कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. काळम्मावाडीचे पाणी सुरू झाल्यावर शिंगणापूरचे पाणी बंद होणार आहे. काळम्मावाडीचे पाणी पुईखडीला आल्यावर 80 आणि 60 अशा 140 एमएलडी पाण्यावर याठिकाणी स्वच्छतेची प्रक्रिया होणार आहे. त्याबरोबरच कसबा बावडा येथेही 43 एलएलडी पाणी स्वच्छ करण्यासाठी जल शुद्धीकरण केंद्र सुरू राहणार आहे.

पंपिंग मशिनरींचे एनर्जी ऑडिट…

कोल्हापूर शहराला पाणी उपसा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रे आहेत. पंचगंगा व भोगावती नदीवर ही उपसा केंद्रे असून ती जुनाट आहेत. बालिंगा उपसा केंद्र सन 1949, नागदेववाडी उपसा केंद्र 1989 सालात तर शिंगणापूर उपसा केंद्र 2000 मध्ये बांधण्यात आले आहे. उपसा केंद्रातील पंपांची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाण्याचा उपसा होत नाही. परिणामी शहरवासीयांना कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने उपसा केंद्रातील पंपिंग मशिनरींचे एनर्जी ऑडिटही केले जाणार आहे. त्यासाठी 36 लाखांची तरतूद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *