अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य पोहोचणार सातासमुद्रापार!
महाराष्ट्र शासनाच्या (government) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या अथक प्रयत्नातून अण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय कादंबरी व कथा खंडांचे आठ भाग डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ई-बुक व ऑडिओ बुक स्वरूपात राज्य सरकारतर्फे एक ऑगस्टला प्रकाशित होत आहे. यानिमित्ताने अण्णा भाऊंचे साहित्य विचार सातासमुद्रापार पोहोचणार आहेत.
राज्य शासनाच्या (government) या अभिनव उपक्रमातून अण्णा भाऊ साठे जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहेत. ई-बुक व ऑडिओ बुकमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या निवडक वाङ्मयातील चार खंड 8 भागांत प्रकाशित होणार आहेत. यात 30 कादंबर्या व 10 कथासंग्रहांचा समावेश आहे. सुमारे पाच हजार पानांचे हे लेखन साहित्य आहे. सर्व कादंबर्या व कथाचे ऑडिओ व ई-बुक करण्याचे काम पुस्तक मार्केट पब्लिकेशनने केले आहे. लवकरच पुस्तक मार्केट अॅपवर वाचकांना हे साहित्य मोफत ऐकता, वाचता येणार आहे.
अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीने दोन वर्षांत अनेक बैठका घेतल्या. मागील पूर्व प्रकाशित कादंबरी खंड पुनर्प्रकाशित करणे, याशिवाय नव्याने कादंबरी व कथेचे चार भाग प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समितीचे सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे यांच्यासह समिती सदस्य डॉ. शरद गायकवाड, शिवा कांबळे, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. सोमनाथ कदम, डॉ. विजय कुमठेकर, प्राचार्य डॉ. बी. एन. गायकवाड यांनी अथक परिश्रम घेत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर चित्रपट व गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचे समितीचे काम प्रगतीपथावर आहे.
अण्णा भाऊंच्या जन्मदिनी होणार ऑडिओ, ई-बुकचे प्रकाशन…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष व उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, निमंत्रक सदस्य उच्च शिक्षण शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या सहकार्यातून साकारलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या निवडक वाङ्मयाच्या कादंबरी व कथांच्या आठ भागाचे प्रकाशन व ऑडिओ, ई-बुकचे प्रसारण एक ऑगस्टला अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिनी प्रकाशित करण्याचा समितीचा मानस आहे.