शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

जूनपासून आजअखेर केवळ 30 टक्केच पाऊस झाल्याने जिल्ह्यात तब्बल 80 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून आहे. सर्वात भयावह स्थिती शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात आहे. शिरोळमध्ये 21 टक्के तर हातकणंगलेत 31 टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. आठ दिवसांत पेरणी (sow) व रोप लागण न झाल्यास शेतकर्‍यांना जमीन पिकाविना मोकळी ठेवावी लागण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

खरिपातील पेरण्या या जुलै महिन्याच्या आतच व्हायला हव्यात. त्यानंतर केली जाणारी पेरणी ही लाभदायक ठरत नाही, असे कृषी शास्त्रज्ञ सांगतात. यावरून शिरोळ तालुक्यात उर्वरित क्षेत्रात पेरणी होण्याची शक्यता कमी असून तालुक्यातील 10 ते 15 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून राहू शकेल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर होणार आहे.

जिल्ह्यात खरिपासाठी एकूण 1 लाख 92 हजार 633 हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्रात भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, नाचणी, वरी ही पिके घेतली जातात. त्यापैकी केवळ 1 लाख 13 हजार 546 हेक्टरवर भात, सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांच्या पेरण्या (sow) झाल्या आहेत. म्हणजे जिल्ह्यात 58.95 टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रावर पुरेसा पाऊस नसल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. पावसामुळे माळरानावरील पिकांना दिलासा मिळाला आहे. पण भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा या तालुक्यात भात आणि नाचणी रोप लागणीचे क्षेत्र अधिक आहे. पुरेसा पाऊस नसल्यामुळे डोंगर कपारीच्या भागात असलेल्या जमिनीच्या क्षेत्रावर भात आणि नाचणीचे रोप लागण रखडत आहे. त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वात जास्त कागल तालुक्यात 82.22 टक्के

शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यात खरीपासाठी पेरणीचे क्षेत्र सुमारे 29 हजार हेक्टर आहे. आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील खरीपाच्या एकूण 3130 हेक्टरपैकी 660 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर हातकणंगले तालुक्यातील 25330 हेक्टरपैकी 7987 हेक्टवर पेरणी झाली आहे. या दोन तालुक्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या रखडलेल्या आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त कागल तालुक्यात 82.22 टक्के तर सर्वात कमी शिरोळ तालुक्यात 21 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात 92320 हेक्टरवर भात घेतला जातो. यापैकी यंदा 59175 हेक्टवर भाताची लागण झाली आहे. 17100 हेक्टरवर नाचणी घेतली जाते. आतापर्यंत केवळ 4415 हेक्टवर नाचणीची रोप लागण झाली आहे.

काही भागात पेरणीसाठी धांदल

पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांची पेरणीसाठी धांदल उडाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील माळ रानावर येणारी ज्वारी, बाजरी, भुईमूग, उडीद, तूर, मका, तीळ, वरी या पिकांच्या पेरणीच्या कामात शेतकरी गुंतला आहे. जिल्ह्यात 80 ते 100 मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *