पंचगंगा पात्राबाहेर; 49 बंधारे पाण्याखाली गेल्याने दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला

जिल्ह्यात बुधवारी सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या संततधारेने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगेची जलपातळी बुधवारी 13 तासांत सहा फुटांनी वाढली. यामुळे पंचगंगा (river) यावर्षी रात्री प्रथमच पात्राबाहेर पडली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 49 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यापैकी गेल्या 24 तासांत 36 बंधारे पाण्याखाली गेले. बुधवारी शहरात सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांत 22.2 मि.मी. पाऊस झाला. पावसाने दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा गुरुवारचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे.

मंगळवारपासून सुरू असलेल्या पावसाचा बुधवारी जोर आणखी वाढला. शहरासह जिल्ह्याच्या विशेषत: पश्चिम भागात आणि धरण क्षेत्रांत धुवाँधार पाऊस सुरू होता. संततधारेने अवघ्या दोनच दिवसांत जिल्ह्यातील चित्र पूर्णपणे बदलले आहे. नद्या, नाल्यांना पूर आला असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांवरील बंधारे पाण्याखाली जात असल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जात आहे, त्याचा परिणाम एस.टी. सेवेवरही होऊ लागला आहे. 49 बंधारे पाण्याखाली गेल्याने सुमारे दीडशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.

पावसाने पंचगंगेच्या (river) पाणी पातळीत सकाळपासून झपाट्याने वाढ सुरू झाली आहे. मंगळवारी रात्री पंचगंगा 17 फुटांवर होती. बुधवारी सकाळी साडेसात वाजता पाणी पातळी 21.9 फूट झाली. रात्री आठ वाजता पाणी पातळी 27.8 फुटांपर्यंत गेली. रात्री पंचगंगेचे पाणी पंचगंगा विहार मंडळाच्या बाजूने पात्राबाहेर पडले. यावर्षी पंचगंगा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली.

जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. धरण क्षेत्रांत पावसाचा जोर अधिक होता. राधानगरी, तुळशी, कासारी, कडवी, घटप्रभा या चार धरण क्षेत्रांत आठ तासांत अतिवृष्टी झाली. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली असून, दुपारी चार वाजेपर्यंत धरण 60 टक्के भरले. धरणात सध्या 5.06 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. वारणा धरणही आज दुपारी निम्मे भरले. धरणात 50.15 टक्के म्हणजेच 17.25 टीएमसी पाणीसाठा झाला. जांबरे मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून, त्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात आजअखेर तीन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पावसाने कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर वारूळ गावाजवळ झाड पडले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मात्र, झाड हटवून काही वेळात वाहतूक पूर्ववत करण्यात आली. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरही साळवण पुलावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक बंद होती. शाहूवाडी तालुक्यातील कांटे बंधारा पाण्याखाली गेल्याने बर्की धबधब्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली.

जिल्ह्यात बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 14 धरण क्षेत्रांसह गगनबावडा आणि चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली. यावर्षी पावसाळ्यात प्रथमच दमदार पावसाची नोंद झाली. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ-बदलापूरदरम्यान रेल्वे मार्गावर पाणी आल्याने कोल्हापुरातून बुधवारी सकाळी सुटलेली कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यातच थांबविण्यात आली. यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *