कोल्हापूर : रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद
रांगणा किल्ला (Rangana Fort) आणि परिसरातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बंदी घातली आहे. वर्षा पर्यटनासाठी गेलेले पर्यटक ओढ्याच्या पुरामुळे किल्ल्यावर अडकले होते. भुदरगड तालुक्यातील सर्व धबधब्यांवरही पर्यटकांना तसेच स्थानिकांनाही बंदी घालण्यात आल्याचे भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी सांगितले.
किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी
भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी गावातील माथ्यावर असणार्या रांगणा किल्ल्यावर (Rangana Fort) पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. रांगणा किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यामध्ये 24 तासांत सरासरी 100 किंवा त्यापेक्षा जास्त पर्जन्यमान होते. किल्ल्यावर जाण्यासाठी अत्यंत बिकट वाट आहे. किल्ल्यावर जाताना वाटेवर 5 ते 6 ओढे-नाले आहेत. तसेच किल्ल्याच्या परिसरात नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे संपर्क करता येत नाही.
दि. १८ जुलै रोजी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले १७ पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये किंवा एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव येथील नाईकवाडी व दोनवडे येथील सवतकडा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन अडसूळ यांनी केले आहे.