कोट्यवधींना गंडा घालणार्‍या ‘ए.एस. ट्रेडर्स’च्या फरार महिला संचालिकेला अटक

(crime news) दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींना गंडा घालणार्‍या ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंट कंपनीच्या फरार संचालिका सुवर्णा श्रीरंग सरनाईक (वय 57, रा. अंबाई टॅक, रंकाळा) यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दरम्यान, मुख्य संशयित रोहितसिंग सुभेदारसह फरार संचालकांच्या मालमत्तांचा छडा लावण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुरुवारी दिले.

कंपनीशी संबंधित असलेल्या दोन महिलांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यापैकी संचालिका सुवर्णा सरनाईक यांना दुपारी अटक करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांतील आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर तपास अधिकार्‍यांना सखोल चौकशी आणि कारवाईच्या सूचना केल्याने चौकशीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यांतील गुंतवणूकदारांना कोट्यवधीची आर्थिक झळ सोसावी लागलेल्या ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांतील संशयिताविरुद्ध यापूर्वीच शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तत्कालीन तपासाधिकार्‍यांच्या वेळकाढूपणामुळे गुंतवणूकदारांना मन:स्ताप सोसावा लागत आहे. शाहूपुरी पोलिसांनी तीन महिन्यांच्या काळात केवळ एका संशयिताला अटक केल्याने तत्कालीन अधिकार्‍यांचा तपास संशयाच्या भोवर्‍यात अडकला आहे.

ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांच्या आर्थिक उलाढालीत झालेल्या अनियमिततेची पोलिस अधीक्षक पंडित यांनी दखल घेतली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासाचाही नुकताच आढावा घेतला. फसवणुकीची व्याप्ती खोलवर असल्याने चौकशीची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या संशयितांना तातडीने अटक करून त्याच्या बेनामी मालमत्तांचा शोध घेऊन त्यावर टाच आणण्यासाठी तपास गतिमान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे सांगण्यात आले. (crime news)

तीन हजार कोटींचा गैरव्यवहार; प्रत्यक्ष तक्रारी मात्र 45 कोटींच्या

ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांमध्ये सुमारे तीन हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असावा, असा तपासाधिकार्‍यांचा संशय आहे. फसवणूकप्रकरणी सात महिन्यांच्या काळात केवळ 40 ते 45 कोटींपर्यंत फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे प्रमाण अत्यल्प आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रे, पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

दोषी आढळल्यास कारवाई होणार : गायकवाड

कंपनीच्या आर्थिक उलाढालीशी संबंधित असलेल्या दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर सरनाईक यांना दुपारी अटक करण्यात आली आहे. अन्य एका महिलेकडे चौकशी करण्यात येत आहे. दोषी आढळून आल्यास संबंधित महिलेवरही कारवाई करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *