जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका असणार्या 88 गावांत पथके राहणार कार्यरत
जिल्ह्यात भूस्खलनाचा धोका असणार्या 88 गावांत आता जिल्हा प्रशासनाची पथके (Squads) कार्यरत राहणार आहेत. मोठा पाऊस असेल त्यावेळी दररोज सकाळी व संध्याकाळी या पथकाकडून परिसराची पाहणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. भूस्खलनाच्या पाश्वर्भूमीवर सर्व यंत्रणांना दक्षतेच्या सूचनाही गुरुवारी देण्यात आल्या.
जिल्ह्यात भूस्खलनाचा 88 गावांना धोका आहे. या गावांत रस्ता खचणे, डोंगर खचणे आदी विविध प्रकारच्या आजवर शंभरहून अधिक लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत कमी दिवसांत जास्त पाऊस पडण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. यामुळे भूस्खलनाचेही प्रमाण गेल्या चार-पाच वर्षांत वाढले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील नागरिकांना दरवर्षी सूचना देण्यात येतात.
रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीत सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना रेखावार यांनी केल्या. संभाव्य गावांवर तसेच परिसरावर सातत्याने लक्ष ठेवा, प्रत्येक घडामोडी गांभीर्याने घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
कांडवणमधील 23 कुटुंबांचे स्थलांतर
शाहूवाडी तालुक्यातील कांडवण येथील 23 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी सांगितले. 2019 मध्ये या गावाजवळ भूस्खलन झाले होते. यावर्षीही हा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबांचे गावातील प्राथमिक शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.
स्थानिक यंत्रणेशी सातत्याने संपर्क
भूस्खलनाचा धोका असलेल्या 88 गावांत वनक्षेत्रपाल, तलाठी आणि ग्रामसेवक यांचे संयुक्त पथक कार्यरत राहील, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले. या गावांत तसेच परिसरात मोठा पाऊस झाल्यानंतर संबंधित पथकाकडून (Squads) सकाळी आणि संध्याकाळी परिसराची पाहणी केली जाणार आहे. या कालावधीत गावातील स्थानिक यंत्रणेशी सातत्याने संपर्क ठेवला जाणार आहे.