पंचगंगा इशारा पातळीकडे; नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी
जिल्ह्यात गुरुवारीही पावसाचे धूमशान सुरू होते. जोरदार पावसाने (rain) बुधवारी पात्राबाहेर पडलेली पंचगंगा गुरुवारी इशारा पातळीकडे चालली आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगेची पातळी सहा फुटांनी वाढली आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर दोन दिवसांत ती इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 61 बंधारे पाण्याखाली आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक गावांचा एकमेकांशी असणारा थेट संपर्क तुटला असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी दिवसभर कायम होता. जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: राधानगरी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, घटप्रभा, जाबंरे आदी धरण परिसरात गुरुवारी सकाळी आठपासून सांयकाळी चार वाजेपर्यंत अतिवृष्टी सुरू होती. जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती. कोल्हापूर शहर आणि परिसरातही अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी बरसत होत्या.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत प्रमुख 15 धरणांपैकी जांबरे (40) व जंगमहट्टी (60) वगळता सर्वच धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. कोदे परिसरात सर्वाधिक 228 मि.मी. पाऊस झाला. राधानगरीत 107, तुळशीत 128, दूधगंगा 68 मि.मी., वारणा 102 मि.मी., कासारी 149 मि.मी., कडवी 145 मि.मी., कुंभी 138 मि.मी., पाटगावात 188 मि.मी., चिकोत्रा 71 मि.मी., चित्री 91 मि.मी., घटप्रभेत 178 तर आंबेओहळ प्रकल्पात 74 मि.मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 36.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा (104.7 मि.मी.) व शाहूवाडी तालुक्यात (65.8 मि.मी.) अतिवृष्टी झाली. पन्हाळ्यात 51.2, राधानगरीत 46.5, चंदगडमध्ये 48, भुदरगडमध्ये 46.7, करवीरमध्ये 34.2 मि.मी. पाऊस झाला. कागलात 23.3, शिरोळमध्ये 19.1, हातकणंगलेत 17.2, गडहिंग्लजमध्ये 15.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.
पावसाने (rain) धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगेची पातळी सकाळी 31.6 फूट होती. सायंकाळी 4 वाजता ती 33 फुटांवर गेली. रात्री नऊ वाजता ती 33.11 फुटांपर्यंत गेली. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. गुरुवारी रात्री पंचगंगेचे पाणी गंगावेश-शिवाजी पूल रस्त्याजवळ आले होते.
नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी
नृसिंहवाडी : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे कृष्णा व पंचांगगा नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, येथील दत्त मंदिरात गुरुवारी रात्री पाणी आले असून पहाटे पहिला दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पडणार्या पावसामुळे येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पातळीत सुमारे दहा फूट वाढ झाली आहे. दोन्ही नद्यांच्या मध्ये असणारे संगम मंदिर पूर्ण बुडाले असून दत्त मंदिरासमोरील पोर्चवर सध्या दोन फूट पाणी आले आहे. दत्त मंदिरातील दक्षिणद्वार सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक, दत्तभक्त प्रतीक्षेत आहेत.