गडमुडशिंगी येथे बेवारस स्थितीत सापडली सोन्याची बिस्किटे, नाणी

गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे तळ्याकाठी खेळत असलेल्या मुलांना गवतामध्ये प्लास्टिक पिशवीत ३९४ ग्रॅम वजनाचे सोने सापडले. यामध्ये सोन्याची बिस्किटे (Golden Biscuits) आणि नाण्यांचा समावेश आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत २४ लाख २९ हजार ५०० रुपये इतकी आहे.

गांधीनगर पोलिसांना (Gandhinagar Police) सुगावा लागताच त्यांनी ती ताब्यात घेतली. संबंधित सोन्यावर अद्याप कोणीही हक्क दाखविण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे बेवारस सापडलेले सोने कोणाचे, अशी चर्चा गांधीनगरात सुरू आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गडमुडशिंगीतील (Gadmudshingi) तळ्याजवळ १६ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रोहित विश्वास गडकरी, ऋषिकेश विश्वास गडकरी, चेतन सुभाष गवळी आणि नागेश महेश कांबळे ही लहान मुले खेळत होती. त्यांना गवतात प्लास्टिकची (Golden Biscuits) पिशवी सापडली. त्यात सोनेरी चौकोनी लहान-मोठी बिस्किटे आणि नाणी होती.

त्यांनी पिशवी तशीच गावातीलच विश्वास गडकरी यांच्याकडे दिली; पण तळ्याकाठी सोन्याची बिस्किटे आणि नाणी याची चर्चा गावात सुरू झाली. त्याची चाहूल गांधीनगर पोलिसांना लागताच त्यांनी याचा गोपनीय तपास करत विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांचे घर गाठले. त्याच्याकडे सखोल चौकशी करताना सोने सापडल्याचे सत्य उघड झाले.

पोलिसांनी गडकरी यांच्या ताब्यातून सारा ऐवज ताब्यात घेतला. याची गांधीनगर पोलिस ठाण्यात रीतसर नोंद केली. सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील, हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, संदीप कुंभार, चेतन बोंगाळे, संतोष कांबळे यांनी या प्रकरणाचा उलगडा केला.

काय होते पिशवीत?

३२९.४०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट

१० ग्रॅम वजनाची ४ सोन्याची बिस्किटे

१० ग्रॅम वजनाची २ नाणी

५ ग्रॅम वजनाचे एक नाणे

सोनाराकडून सत्यता तपासली

पोलिसांनी सर्व सोने खरे आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी गांधीनगर येथील एका ज्वेलरी दुकानातून तपासणी केली. त्यावेळी सोने खरे असल्याचे स्पष्ट झाले.

परिसरात एकच चर्चा

गडमुडशिंगी येथे बेवारस स्थितीत सापडलेली सोन्याची बिस्किटे, नाणी कोणाची असावीत, याची पंचक्रोशीमध्ये चर्चा सुरू होती. मालकी हक्क दाखविण्यासाठी अद्यापतरी कोणीही पुढे आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *