पन्हाळा तालुक्यातील डोंगराला मोठ्या भेगा; भूस्खलनाचाही धोका

पन्हाळा तालुक्यातील नावली पैकी धारवाडीत डोंगराला मोठ्या भेगा (cracks) पडल्याचे समोर आले आहे. जोरदार पावसाने या परिसराला भूस्खलनाचाही धोका असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून मंगळवारी धारवाडीतील 45, तर आपटी पैकी जाधववाडीतील 15 कुटुंबांचे जवळच नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

नावली पैकी धारवाडीत 45 कुटुंबांची घरे डोंगर उताराला लागून आहेत. याच डोंगरावर मोठ्या भेगा (cracks) पडल्याचे सोमवारी गुरे चारण्यासाठी गेलेल्या स्थानिकांच्या निदर्शनास आले. मंगळवारी सकाळी पुन्हा गेलेल्या स्थानिकांना या भेगांचा आकार आणखी मोठा झाल्याचा तसेच त्यांची लांबीही वाढल्याचे दिसले. ही माहिती समजताच पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या परिसराची पाहणी केल्यानंतर जोरदार पावसाने भूस्खलनाचा धोका असल्याने धारवाडीतील नागरिकांसह याच डोंगराला लागून असलेल्या आपटी पैकी जाधववाडीतील कुटुंबांचेही स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पन्हाळा-शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड आदींसह पोलिस व महसूल कर्मचारीही घटनास्थळी आले. नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले. काही नागरिकांनी नावली येथील नातेवाईकांकडे स्थलांतरित होण्याची तयारी सुरू केली. काहींनी स्थलांतराला विरोध करताच, त्यांचे पोलिसांच्या मदतीने सक्तीने स्थलांतर करण्यात आले. गावातील केवळ पाचच जण परिसरातील शाळेत थांबले असून, परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, करवीर तालुक्यातील शिपेकरवाडी येथेही डोंगरातील दरडीचा काही भाग मंगळवारी कोसळला. यामध्ये सुदैवाने जीवित व वित्तहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *