अलमट्टीतून विसर्ग वाढविला; कोल्हापूर, सांगलीला तुर्तास दिलासा

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढत आहे. त्या प्रमाणात या तीन जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरण प्रशासनाने अलमट्टी धरणातील विसर्ग (dissolution) आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळी ११ वाजल्यापासून अलमट्टीतून प्रतिसेकंद १.५० लाख क्युसेक या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. सध्या धरणातून १.२५ लाख क्युसेक विसर्ग (dissolution) सुरू आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभाग परस्परांशी संपर्क ठेवून आहे. दरम्यान, आज सकाळपासून चांदोली धरणातूनही विसर्गात वाढ करण्यात आली असून सध्या ६७८० क्युसेक प्रतिसेकंद या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, कृष्णा आणि पंचगंगा नदीकाठच्या लोकांमध्ये संभाव्य महापुराविषयी चिंतेचे ढग दाटून आल्याचे दिसत आहे.