ललित पाटील प्रकरणात ट्विस्ट, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?

(crime news) ड्रग्स माफिया ललित पाटील याला काल पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्याचा ताबा सध्या मुंबई पोलिसांकडे आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहितीसमोर येत आहे. एकीकडे ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होणार असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक पोलिसांनी काल प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन महिलांना अटक केली होती. त्यानंतर आज भल्या पहाटे या दोघींना पुणे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात या दोन्ही महिलांनी मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही महिलांची कसून चौकशी करत आहेत.

फरार होण्यास मदत

ललित पाटील फरार होण्यापूर्वी एक दिवस आधी तो प्रज्ञा कांबळेकडे येऊन राहिला होता. प्रज्ञाने त्याला आश्रय देऊन फरार होण्यास मदत केली होती. यावेळी ललितने प्रज्ञाकडून 25 लाख रुपये घेतले होते. त्याने प्रज्ञाकडे चांदीही ठेवली होती. त्याची बेनामी संपत्ती प्रज्ञाकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञाला अटक केल्याने आता तिच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

ललितची बेनामी संपत्ती आहे का? ललितला फरार होण्यासाठी कशी मदत केली? नाशिकमध्ये ड्रग्सचं रॅकेट कोण चालवतं? या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे? तसेच नाशिक, पुण्यासह इतर शहरात हे रॅकेट्स आहे काय? ते कोण चालवतं? ड्रग्स कुठून आणलं जातं? कुठं लपवलं जातं? याची माहितीही प्रज्ञाच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिली. त्यामुळे प्रज्ञा आणि अर्चना पोलीस चौकशीत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ललित पाटील याचे धक्कादायक खुलासे

दरम्यान, ललित पाटील याने मुंबई पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. दीड तासात परत येतो सांगून ललित पाटील ससून रुग्णालयाच्या बाहेर पडला होता. त्यानंतर तो आलाच नाही, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. तसेच पोलीस, रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांना मॅनेज केलं जायचं. त्यांना पैसे दिले जायचे. (crime news)

तसेच रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी त्या पद्धतीने कागदपत्रं तयार केली जायची. तसेच रुग्णालयातूनच ड्रग्सचं सिंडिकेट चालवलं जायचं आणि भाऊ भूषणसोबतही या रुग्णालयातच भेटी घेतल्या जायच्या असं त्याने पोलिसांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *