कवठेएकंद येथील शेतकऱ्यांना क्षारपड मुक्तीच्या प्रकल्पासाठी सर्व ती मदत करणार : श्री दत्त साखरचे चेअरमन गणपतराव पाटील

शिरोळ/ प्रतिनिधी:

(local news) श्री दत्त साखर कारखान्याच्या क्षारपड मुक्तीच्या ‘दत्त पॅटर्न’ला मोठे यश मिळत आहे. आठ हजार एकरावर जमीन क्षारपड मुक्त करून सध्या साडेतीन हजार एकरामध्ये शेतकरी उत्पादन घेत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली आहे. कवठेएकंद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामुदायिकरित्या क्षारपड मुक्तीचा प्रकल्प राबविल्यास सर्व ती मदत, तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन निश्चितपणे करू. जमीन क्षारपडमुक्त करून नव्या पिढीच्या हातात शाश्वत आणि सुपीक जमीन देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

कवठेएकंद (जिल्हा सांगली) येथे स्वर्गीय आर. आर. पाटील सभागृहात सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर एक व दोन च्या वतीने आयोजित क्षारपड जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र थोरात होते.

गणपतराव पाटील पुढे म्हणाले, जादा पाणी, रासायनिक खते, सेंद्रिय कर्बाचा अभाव यामुळे जमीन क्षारपड आणि नापीक बनली आहे. ज्यामुळे उत्पादन करणाऱ्या जमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होऊन अन्न उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळे येत आहेत. अशावेळी उपलब्ध असणारी जमीन क्षारपड मुक्त केल्यास ती पुन्हा वापरता येऊ शकते. यामुळे जमिनीतील अतिरिक्त पाणी आणि क्षार बाहेर जाऊन सुपीकता वाढते. शिरोळ तालुक्यात हा प्रयोग तांत्रिक आणि प्रात्यक्षिक दृष्ट्या यशस्वी झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक संपन्नता आली आहे. कवठेएकंद आणि परिसरामध्ये क्षारपडमुक्तीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून येथील जमिनी सुधारण्यासाठी क्षारपड मुक्तीच्या ‘दत्त पॅटर्न’नुसार आम्ही सर्व ती मदत करण्यास तयार आहोत. त्याच पद्धतीने डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासही आम्ही तयार आहोत. शेतकऱ्यांनी क्षारपड मुक्तीच्या या पॅटर्नची सखोल माहिती घेऊन हा प्रकल्प राबवावा.

दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा म्हणाले, दत्त पॅटर्नच्या संशोधन प्रबंधाला भारतात दुसरा क्रमांक मिळाला आहे. शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलून अभ्यास करावा. रासायनिक खते, पीक पद्धती, नांगरणी, पाणी देण्याची पद्धत अशा विविध गोष्टींमुळे जमिनी नापीक होत आहेत. सच्छिद्र निचरा प्रणाली प्रकल्प करून जमिनी सुपीक कराव्यात.

कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे यांनी प्रकल्पाची तांत्रिक बाबी, सर्व्हे, जमिनीचा चढ उतार, पाणी कोठे सोडावे, डिझाईन, मुख्य पाईप लाईन, अंतर्गत पाईप लाईन अशा सर्व बाबींची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी अमृत सागर म्हणाले, क्षारपड मुक्तीची ही चळवळ गणपतराव पाटील (दादा) यांच्या माध्यमातून शिरोळ तालुकाच नव्हे तर इतर भागातही रुजली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होत आहे. या प्रकल्पाचे यश आणि आदर्श घेऊन आपणही क्षारपडमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदवावा.(local news)

प्रा. बाबुराव लगारे म्हणाले, क्षारपड मुक्तीच्या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक झाली असून, त्याची प्रत्यक्ष पाहणी आणि अभ्यास केला जात आहे. सर्व्हे कामाला येणारा खर्च हा सिद्धराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर एक व दोन यांच्या माध्यमातून करण्यास आम्ही तयार आहोत. यानंतर शेतकऱ्यांचा सहभाग, योजना कशी राबवावी, येणारा खर्च, संस्था स्थापन करणे आधी सविस्तर गोष्टी गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच करू. शेतकऱ्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले.

विद्यासागर लंगडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवाजी पोळ, डॉ. नरेंद्र खाडे, रामचंद्र थोरात, नागसेन कांबळे, अशोक घाईल, सर्जेराव पाटील, सिराज मुजावर, प्रवीण वठारे, सुधीर खाडे, दीपक घोरपडे, विजयराव पाटील, उमेश माळी, भाऊसो शिरोटे, महादेव देशमाने, सुरेंद्र शेंडगे, रामराव पाटील, अशोकराव माळी, राजेंद्र माळी, सूर्यकांत पाटील, संजय थोरात, प्रकाश देसाई, दत्तचे माती परीक्षक ए. एस. पाटील, शक्तीजीत गुरव, संजय सुतार यांच्यासह पाणीपुरवठा संस्थेचे सर्व सदस्य, शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *