कुडित्रेत वृद्धाचा निर्घृण खून

(crime news) कुडित्रे (ता. करवीर) येथे आंबेडकर चौकात डोक्यात लाकडी ओंडक्याचे घाव घालून वृद्धाचा खून करण्यात आला. जंबाजी भगवंत साठे (वय 65) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी रत्नदीप ऊर्फ रतन बाळासो भास्कर (वय 38 ) याला अवघ्या दोन तासांत करवीर पोलिसांनी अटक केली.

जंबाजी साठे हे शाहू हरिजन पाणीपुरवठा येथे पाटक्या म्हणून काम करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास आंबेडकर चौक परिसरात पाण्याचे पाळीपत्रक सांगण्यासाठी ते थांबले होते. त्याचवेळी अचानक रतन भास्कर तिथे आला आणि त्याने लाकडी ओंडक्याने साठे यांच्या डोक्यावर घाव घातले. यात साठे यांचा जागीच मृत्यू झाला. साठे निपचित पडल्याचे लक्षात येताच संशयिताने एकाची दारात लावलेली दुचाकी घेऊन पलायन केले. हा हल्ला ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. मृतदेहापासून लाकडी दांडके अंदाजे 30 ते 35 फुटांवर पडले होते.

घटनास्थळी दंगल नियंत्रक पथक

संशयित भास्कर हा व्यसनाधीन असून, त्याच्यावर यापूर्वी पोलिस ठाण्यात चोरी, बलात्कार असे गुन्हे दाखल असल्याची चर्चा घटनास्थळी होती. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कळंबकर, जालिंदर जाधव, आप्पासाहेब पवार, विनायक सपाटे, एलसीबीचे सुजय दानवे, विजय तळसकर, सुशांत धनवडे, दंगल नियंत्रक पथकाची कुमक उपस्थित होती. (crime news)

महिलांचा आक्रोश

मृत जंबाजी साठे यांच्या मागे पत्नी, मुलगा व चार विवाहित मुली आहेत. घटनास्थळी महिलांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता. महिलांनी संशयित आरोपीच्या घरावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस व दंगल नियंत्रण पथकातील पोलिसांनी त्यांना अटकाव केला. उपअधीक्षक जयश्री देसाई यांनी त्यांची समजूत काढली.

नातेवाईक आक्रमक

मृत साठे यांचे नातेवाईक जीवन महापूरे, शंभु महापूरे यांच्यासह नातेवाईकांनी मृतदेह हलविण्यास अटकाव केला. चार तास मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात होता. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली. नातेवाईकांची समजूत काढत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *