आता अक्षांश-रेखांशासह मिळणार मोजणी नकाशे!
भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी झाल्यानंतर आता मिळणारे नकाशे (Maps) अक्षांश व रेखाशांसह नागरिकांना मिळणार आहेत. मोजणी नकाशाची नागरिकांना दिली जाणारी ‘क’ प्रत आता अक्षांश व रेखाशांसह दिली जाणार आहे. तसा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. यामुळे हद्दीवरून होणारे वाद कमी होणार आहेत.
जमीनधारकाच्या तसेच शासकीय कामकाजासाठी जमिनीची भूमिअभिलेख विभागाकडून मोजणी होते. भूमिअभिलेख विभागाकडे असणार्या रेकॉर्डनुसार जमिनीच्या हद्दी कायम करणे, जमिनीचा झालेला पोटहिस्सा मोजणी करून नवीन पोटहिस्सा तयार करणे, त्यानुसार नवीन रेकॉर्ड तयार केले जाते. त्यानुसार तयार झालेले जागेचे नकाशे योग्य परिमाणात संबंधित टिपा लिहून मोजणी नकाशाची ‘क’ प्रत दिली जाते.
सध्या जी.आय.एस. आधारित जी.एन.एस.एस. रोव्हर्स व इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन मशिन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी केली जात आहे. जी.एन.एस.एस. रोव्हर्सद्वारे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहेत. याबाबत नंदुरबार व वाशिम या दोन जिल्ह्यांत तसेच अन्य जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली प्रणाली संपूर्ण राज्यभर लागू केली जाणार आहे. त्यानुसार मोजणी केलेल्या नकाशे हे अक्षांश आणि रेखांशासह उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या नकाशांनी (Maps) काय होणार…
नागरिकांनाही स्वत: हद्द निश्चित करता येणार.
केव्हाही मोजणी करता येणार, नेमकी जागा समजणार.
मोजणीवेळी मानवी चुकांमुळे हद्द, क्षेत्रात होणारी गफलत, दोन मोजणीमुळे हद्दीत पडणारे अंतर, गट एकमेकांच्या हद्दीत जाणे असे वाद, तक्रारी कमी होणार.