कोल्हापूर जिल्ह्यातील बंगले फोडणार्या चोरट्याला बेड्या
(crime news) भरदिवसा गजबजलेल्या परिसरात आलिशान बंगले फोडून सीमाभागात धुमाकूळ घालणार्या कर्नाटकातील सराईताला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मंगळवारी बेड्या ठोकल्या. सुमित महादेव निकम (वय 27, रा. गजबरवाडी, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडीचे 20 गुन्हे दाखल आहेत.
चोरट्याकडून 107 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व 520 ग्रॅम चांदीचे दागिने असा 6 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूडमधील 2, राधानगरी 2, शहापूर 2, आजरा व कुरूंदवाडमधील प्रत्येकी एक अशा 8 गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे, असे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. (crime news)
चोरीच्या गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी संशयित मार्केट यार्डात येणार असल्याची माहिती पथकाला मिळताच सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. निकम याच्या कारनाम्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, सुरेश पाटील, सागर माने, तुकाराम राजीगरे यांना सुगावा लागला होता. दोन दिवस पथक त्याच्या मागावर होेते.
मंगळवारी सकाळी निकम यास मार्केट यार्डात ताब्यात घेण्यात आले. अंग झडतीत त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. निकम मूळचा निपाणी तालुक्यातील असून, सध्या तो गजबरवाडी येथे आईसमवेत भाड्याच्या खोलीत राहतो. दिवसभर कारनामे करून रात्री त्याचे घरात वास्तव्य असे. गुन्ह्यातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करून घरात आवडणार्या वस्तू खरेदी करण्यावर तो पैसा उधळत होता, अशीही माहिती चौकशीतून निष्पन्न झाली आहे.
चोरटा स्थानिक साथीदाराच्या संपर्कात
संशयित निकमला शहर, उपनगरांसह ग्रामीण भागातील लोकवस्तीची इत्थंभूत माहिती आहे. बंद बंगल्याची टेहाळणी करून काही तासात मोहीम फत्ते करण्यात तो सराईत आहे. स्थानिक साथीदार त्याच्या संपर्कात असावेत, असा संशयही तपासाधिकारी रवींद्र कळमकर यांनी व्यक्त केला.