लग्नाच्या धामधुमीत धक्कादायक प्रकार उघडकीला
(crime news) लग्नाच्या धामधुमीत खोलीतील कपाटामध्ये ठेवलेले भावजयीचे 9 तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास करणार्या नणंदेसह दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयितांकडून 5 लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
अवंती शैलेश शिंदे (वय 33, रा. रविवार पेठ) व विशाल विष्णुपंत शिंदे (38, सोनटक्के तालमीजवळ, रविवार पेठ) अशी त्यांची नावे आहेत. दि. 6 जानेवारीला शिवाजी पेठेत ताराबाई रोडवर दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा अखेर पोलिसांनी छडा लावला. संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
रूपाली सौरभ पिंजरे (रा. ताराबाई रोड) यांच्या घरी लग्नसोहळा असल्याने घरात पाहुण्यांची मोठी वर्दळ होती. या धामधुमीत पिंजरे यांच्या खोलीतील लाकडी कपाटामधील 5 लाख 11 हजार रुपये किमतीच्या 9 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पिंजरे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. लग्न समारंभ असलेल्या घरात चोरी झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी कुटुंबीयांसह सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली; पण थांगपत्ता लागलेला नव्हता. (crime news)
घर झडतीत दागिने हस्तगत
चौकशीत रूपाली पिंजरे यांच्या घरातील चोरीचा उलगडा झाला. संशयित नणंद अवंती हिने भावजयीच्या घरातून लग्नाच्या धामधुमीत सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीला आला. दोन्हीही संशयितांना अटक करून घर झडतीत 5 लाख 11 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आल्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.