कोल्हापुरातील व्यापारी वर्गातून संताप

कोव्हिड नियमांचे शंभर टक्के पालन करूनच कोल्हापुरातील व्यापारी (merchant) व्यवसाय करत आहेत. पण रस्त्यावरच्या गर्दीला दुकानासमोरील गर्दी म्हणून दंड केला जात आहे. कोव्हिड नियमांचा भंग केल्यास 500 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. दिवसभरातील कमाई हजार रुपये व दंड दहा हजार रुपये अशी स्थिती असल्याने व्यापारी वर्गातून संताप व्यक्‍त होत आहे.

जर कोरोनामुळे लॉकडाऊन झाला तर महापालिकेच्या तिजोरीत ठणठणाट असणार आहे. याची जाणीव असल्याने शासनाने तिसरी लाट आली तरी लॉकडाऊन न करता केवळ कडक निर्बंध लागू केले आहेत. व्यापारी वर्गानेही या नियमांचे स्वागत केले.

नियमांचे पालन करून व्यापार्‍यांनी व्यवसाय सुरू केला. पण महापालिका व पोलिसांच्या अरेरावीपणाला व्यापारी वर्ग कंटाळला आहे. रस्त्यावर जरी गर्दी दिसली तरी ती दुकानासमोर झाली, असे सांगून व्यापार्‍यांना दंड आकारला जातो. कपड्यांच्या दुकानात एका कुटुंबातील चार लोक आले तर कामगार धरून पाच ते सहा लोक होतात.

अनेकांकडे लहान मुले असतात. त्यांना बाहेर कसे काढायचे? याचवेळी दुसरे गिर्‍हाईक आले की, त्यांना दुकानाबाहेर उभे राहण्यास सांगितले जाते. तर दुकानाबाहेर गर्दी का, असे विचारून दंड आकारला जातो. यामुळे नेमके काय करायचे, असा प्रश्‍न व्यापार्‍यांना पडला आहे. व्यवसाय करायचा की मिळालेल्या उत्पन्‍नाचा दंड भरत बसयचा, असा सवाल केला जात आहे.

व्यापार्‍यांनी (merchant) शासन नियमांचे पालन करून व्यवसायाला सुरुवात केली आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने कोव्हिडसाठी स्वतंत्र आचारसंहिताही केली आहे. शहरातील पाच हजारहून अधिक व्यापार्‍यांच्या दुकानाबाहेर ‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा’ असे सांगणारे स्टीकर लावल्याचे अजित कोठारी यांनी सांगितले. व्यापार्‍यांकडून जाणीवपूर्वक नियम तोडले जात नाहीत. प्रशासनाला सहकार्य करूनच व्यापारी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे कारवाई करून व्यापार्‍यांना नाहक त्रास देऊ नये, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे.

अशी आहे दंडाची तरतूद

* कोव्हिड नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्‍तीला 500 रुपये दंड
* शासन नियमाचा भंग केला म्हणून व्यावसायिकांना 10 हजार रुपये दंड
* मोठ्या संस्था किंवा कंपनीकडून नियमांचे पालन न झाल्यास 50 हजार रुपये दंड
* कार किंवा बसमधील प्रवाशांकडून नियमांचे पालन झाल्यास 500 रुपयांपासून बस चालकाला दहा हजार रुपये दंड
* वारंवार नियम तोडल्यास व्यापार्‍यांना तुरुंगवास होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *