सांगली : उसात लागवड केलेल्या गांजा शेतीवर छापा
(crime news) संख (ता. जत) येथे उसात लागवड केलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे सव्वा लाखाचा गांजा जप्त केला. बुधवारी सायंकाळी उमदी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली विभागाने ही कारवाई केली. याप्रकरणी उमदी पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केला असता दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तर राजेंद्र बिरादार याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
राजेंद्र शिवाणा बिरादार (वय 57), श्रीकांत शिवाणा बिरादार (वय 56) शटगोंडा शिवाणा बिरादार (वय 58) (सर्व रा. संख) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल संजय पांढरे यांनी उमदी पोलिसात फिर्याद दिली.
संख येथे राजेंद्र व श्रीकांत व शेटगोंडा यांनी गट नंबर 210 मधील उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिस हवालदार नागेश खरात यांना मिळाली. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मदत घेत गांजा शेतीवर छापा टाकला. यावेळी 24 किलो ओला गांजा मिळून आला. या गांजाची बाजारभावाप्रमाणे सुमारे सव्वा लाख किंमत होत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, नागेश खरात, नामदेव काळेल, आप्पासाहेब हाक्के, नितीन पलूसकर, रामराव बननेंवर, संजय पांढरे ,प्रशांत माळी यांनी कारवाईत भाग घेतला. (crime news)