पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आदेश

पंचगंगेची पाणी पातळी (water lavel) वाढतच आहे. मंगळवारपर्यंत ती कमी होण्यास सुरुवात झाली नाही, तर खबरदारी म्हणून संभाव्य पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले. अलर्ट राहा, केलेल्या नियोजनानुसार प्रत्येक बाबीची खात्री करून घ्या, अशा सूचनाही त्यांनी सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या.

जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर पालकमंत्री केसरकर सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली. केसरकर म्हणाले, कोल्हापुरात पाणी शिरले की, त्याचा लवकर निचरा होत नाही. यामुळे पूरस्थिती काही दिवस राहण्याचा धोका असतो. सध्या धरणातून विसर्ग सुरू नाही, तरीही पाणी पातळी वाढत चालली आहे. राधानगरी धरण मंगळवारपर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. याबरोबरच कुंभी आणि कासारी धरणांतूनही पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर कमी झाला असला, तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ (water lavel) सुरूच राहिली, मंगळवारपर्यंत पाणी पातळी कमी होत नाही, असे दिसून आले, तर नागरिकांचे स्थलांतर सुरू करा. कोणत्याही परिस्थितीत बोटीतून नागरिकांचे स्थलांतर होता कामा नये. ती वेळ येण्यापूर्वीच स्थलांतराला सुरुवात करा. याकरिता विभागनिहाय नियोजन करून एस.टी. बसेस सज्ज ठेवा, अशाही सूचना केसरकर यांनी केल्या. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात पुरात नागरिक अडकले आहेत, अशी स्थिती येऊ देऊ नका, त्याबाबत दक्षता घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पूर ओसरल्यानंतर तत्काळ पंचनामे सुरू करा, अशा सूचना कृषी विभागाला देत, काही भागांत पुराच्या पाण्याने विहिरी खराब झाल्या असतील, तर त्यातील गाळ काढण्याचेही काम तत्काळ हाती घ्या. आरोग्यविषयक सर्व तयारी पूर्ण करा. औषधांचा साठा कमी पडणार नाही, याची दक्षता घ्या. धरणातील पाणीसाठ्यावर आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवा. धरणातून होणारा विसर्ग, त्यामुळे वाढणारी पाणी पातळी, त्याकरिता लागणारा कालावधी, त्यातून बाधित होणारे क्षेत्र यासर्वांचा अभ्यास करून त्याबाबत सर्व यंत्रणांशी परस्पर समन्वय ठेवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *