350 व्या शिवराज्याभिषेकानिमित्त शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचे लोकार्पण

350 व्या शिवराज्याभिषेकानिमित्त महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपतींच्या शौर्य-पराक्रम-लोककल्याणकारी कारभाराची साक्ष देणार्‍या चिन्हांसह विशेष बोधचिन्हाची (emblem) निर्मिती केली आहे. याचा लोकार्पण सोहळा नुकताच करण्यात आला असून शासकीय पत्रव्यवहारात, शासकीय कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसिद्धीपत्रकात या बोधचिन्हाचा कटाक्षाने वापर करण्याचा आदेशही काढला आहे.

या आदेशाचे स्वागत स्वराज्य संघटनेचे मार्गदर्शक संभाजीराजे यांनी केले आहे. मात्र, या बोधचिन्हावर शिवराज्याभिषेकाच्या तिथीप्रमाणेच 6 जून या तारखेचाही ठळक व सन्मानपूर्वक उल्लेख करून बोधचिन्ह नव्याने जाहीर करावे, अशी मागणीही आहे. याबाबतचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.

जगाच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याची महती जगभर पोहोचावी, यासाठी तिथीबरोबरच 6 जून ही तारीखही तितकीच महत्त्वाची असल्याचे पत्रात म्हटले आहे. यंदा तारखेनुसार 6 जून रोजी व तिथीनुसार 2 जून रोजी शिवछत्रपतींचा 350 वा राज्याभिषेक सोहळा सर्वत्र साजरा झाला. त्यानुसार राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष सुरू झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने तिथीनुसार होणारा दिन हा शासकीय सोहळा म्हणून साजरा केला होता. तथापि 6 जून रोजी होणार्‍या सोहळ्यासही तिथीसाठी उपलब्ध केल्या जाणार्‍या सर्व सुविधा लागू केल्या जातील, असे बैठकीत ठरले होते. त्यानुसार शिवराज्याभिषेक बोधचिन्हावर (emblem) ‘स्वस्तिश्री राज्याभिषेक शके 350’ यासह ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीचा उल्लेख केला आहे. मात्र, 6 जून जगमान्य कालगणनेचा नाही.

महाराष्ट्र शासनाने यापूर्वी तिथीनुसार होणारी शिवजयंती तारखेनुसार साजरी करण्यास सुरू केली. यासाठी विशेष समिती गठित करून शिवजन्माची तारीख शोधून काढली. असे असताना शिवराज्याभिषेक या ऐतिहासिक घटनेच्या तारखेला शासनाकडून दुजाभाव मिळणे, हे विद्यमान राज्य सरकारच्या प्रतिष्ठेस दूषण लावणारे असल्याचे पत्रात म्हटले आहे.

तुळजाभवानीच्या शिवकालीन दागिन्यांबाबत चौकशी व्हावी

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान व छत्रपतींचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांच्या मोजदादीत काही शिवकालीन मौल्यवान दागिने गहाळ झाल्याचे समजते. याची प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा स्वराज्य संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा संभाजीराजे यांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच भविष्यात सर्व दागिन्यांची मोजणी ऑन कॅमेरा करावी, तसेच याचा संपूर्ण अहवाल सार्वत्रिक करावा, अशी सूचनाही संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *