आधुनिक तंत्रज्ञान वापरून एकरी 200 मे. टन ऊस उत्पादन घेऊ शकतो : वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर

शिरोळ/प्रतिनिधी:

(local news) आपणाला आपल्या शेताचा पूर्ण अभ्यास हवा. सगळी खते सगळ्या शेतात लागू पडत नाहीत. त्यामुळे माती परीक्षण केल्यावरच चांगले जाड बियाणे घेऊन ऊस कालावधीचा विचार करा. अचूक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास शेती फायद्याची होऊ शकते. आपण 200 मे. टन ऊस उत्पादन घेऊ शकतो, असे प्रतिपादन कालवडे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निलेश मालेकर यांनी केले.

श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये श्री दत्त कारखान्यामार्फत ‘झेप 200 मे. टन योजनेत सहभागी सभासदांना जमिनीतील
अन्नद्रव्ये व उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयी मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते.

शाश्वत ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागतीपासून सेंद्रिय कर्ब, लागण पद्धत, ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून समतोल आहारामध्ये रासायनिक व जैविक खते वापरण्याची पद्धत, आळवणी, फवारणी व फवारणीतून देण्यात येणारी आधुनिक खते याबरोबरच पाचट कसे ठेवावे याबाबतचे सखोल मार्गदर्शन डॉ. निलेश मालेकर यांनी प्रोजेक्टरद्वारे केले.

गणपतराव पाटील म्हणाले, सुपर केन नर्सरीची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःची रोपवाटिका तयार केली पाहिजे. खत, पाणी, अन्नद्रव्य यांचे व्यवस्थापन समजून घेऊन सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने काम केल्यास पुढच्या पिढीला आपण चांगली शेतजमीन देऊ शकतो. शेतकरी हा कारखान्याचा केंद्रबिंदू मानून काम करीत असल्याने कारखाना शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी राहून मार्गदर्शन करीत राहील. (local news)

माती परिक्षणावर आधारित ऊस शेती’ याविषयी ए. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी ‘जमिनीतील सुपिकतेविषयी मार्गदर्शन करताना चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या वेळी रोप लागण केल्यामुळे ऊस उत्पादन कमी होत असल्याचे सांगून पाणी, खत, वेळेच्या व्यवस्थापनाविषयी विस्तृत माहिती दिली. जंबूकुमार चौगुले या शेतकऱ्याने आपले अनुभव सांगितले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. मालेकर यांनी उत्तरे दिली.

प्रारंभी प्रतिमापूजन झाले. स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हॉईस चेअरमन अरुण देसाई, संचालक शेखर पाटील, महेंद्र बागी, प्रमोद पाटील, विलास माने यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले. आभार ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *